

वैजापूर : वैजापूर शहरालगत असणाऱ्या शिवशंकरनगर कॉलनीतील रो हाऊसमध्ये चालू असलेल्या जुगार आड्यावर पोलिसांच्या विशेष पथकाने कारवाई करत १८ आरोपींना ताब्यात घेतले आहे. यावेळी पाच लाख १७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अनेक दिवसांपासून शहरालगत असणाऱ्या लाडगाव रोडवरील परिसरातील शिवशंकरनगर कॉलनी येथे बांधकाम चालू असलेल्या एका रो हाऊस मध्ये काही इसम तिर्रट नावाचा जुगार खेळत असल्याबाबत माहिती पोलिसांना मिळाली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत मोरे यांच्या पथकाने सापळा रचत जुगार आड्यावर छापा मारला तेव्हा तिथे १८ आरोपी तिर्रट खेळताना आढळून आले. तेव्हा पथकाने ४६,२४० रोख रकमेसह १६ मोबाईल, ४ दुचाकी व एक चार चाकी असा एकूण ५ लाख १७ हजार ७४० रुपयांचा मुद्देमाल जप्त त्यांच्याकडून जप्त केला.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत मोरे, कर्मचारी जावेद शेख, संदीप आव्हाळे, विनोद जोनवाल व कल्याण खेडकर या पथकातील कर्मचाऱ्यांनी कारवाई केली. या प्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.