

Rahemania Colony, Kiradpura's civic issues stuck in dense settlements
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील रहेमानिया कॉलोनी, मुजीब कॉलोनी, आजम कॉलोनी, शरीफ कॉलोनी व किराडपुरा परिसराचा समावेश असलेला प्रभाग क्रमांक १२ सध्या राजकीय घडामोडींमुळे चर्चेत असला, तरी येथील नागरिकांचे दैनंदिन जीवन मात्र मूलभूत सुविधांच्या प्रतीक्षेत आहे. सुमारे ४३ हजार ८९४ लोकसंख्या असलेल्या या प्रभागात घनदाट वस्ती, नियोजनाचा अभाव आणि महापालिकेची अपुरी यंत्रणा यामुळे समस्या कायम आहेत.
या प्रभागातील बहुतांश भागात अरुंद गल्लीबोळ असून, तेथे घंटागाडी व सफाई कर्मचारीही नियमित पोहोचत नाही. त्यामुळे नागरिकांना रस्त्याच्या कडेला, नाल्यांमध्ये किंवा मोकळ्या जागांवर कचरा टाकावा लागतो. साचलेल्या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे.
भटक्या कुत्र्यांमुळे लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तसेच परिसरातून जाणाऱ्या लहान नाल्यांची नियमित सफाई होत नसल्याने गाळ व कचरा साचतो. हा नाला पुढे मोठ्या नाल्यात मिळत असला, तरी पाण्याचा निचरा सुरळीत होत नसून पावसाळ्यात पाणी तुंबण्याच्या घटना नित्याच्या झाल्या आहेत. तर काही भागांत सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याने साथीच्या आजारांचा धोका वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. काही ठिकाणी मोकळी मैदाने उपलब्ध असतानाही त्यांचा वापर खेळासाठी न होता कचरा टाकण्यासाठी किंवा अवैध पार्किंगसाठी केला जात असून, महापालिकेच्या दुर्लक्षामुळे मुलांसाठी सुरक्षित खेळाचे मैदान उपलब्ध नाही, ही या भागातील नागरिकांची मोठी खंत आहे.
मुख्य रस्त्याचे अपूर्ण नियोजन
राम मंदिर ते आझाद चौकादरम्यानचा ८० फूट रुंद सिमेंट रस्ता असूनही तो वाहतुकीसाठी अडथळा ठरत आहे. दुभाजकांवर वृक्षारोपण व रोड फर्निचर नसल्याने कचरा साचतो. तसेच रस्त्याच्या कडेलाच वाहने उभी राहत असल्याने प्रत्यक्षात केवळ काहीच भाग वाहतुकीसाठी वापरासाठी राहतो. त्यामुळे या भागात वारंवार वाहतुक कोंडीचा सामना करावा लागतो.
आरोग्य सुविधांचा अभाव
या प्रभागात गरीब कुटुंबांची संख्या अधिक असल्याने महिलांना व लहान मुलांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात जावे लागते. त्यावरून परिसरातच मेटरनिटी होम व मोफत बालरुग्णालय सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.
नव्या प्रतिनिधीकडून अपेक्षा
आगामी निवडणुकीच्या पाश्वभूमीवर प्रभाग क्रमांक १२ मधील नागरिकांना स्वच्छता, पाणीपुरवठा, ड्रेनेज, आरोग्य सुविधा आणि खेळाच्या मैदानासाठी ठोस व दीर्घकालीन उपाययोजना अपेक्षित असून, यावेळी निवडून येणाऱ्या प्रतिनिधीकडून प्रत्यक्ष काम होईल, अशीच नागरिकांची अपेक्षा