छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाला आरक्षण हवे असल्यास त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विजयी करावेत. त्यांना आरक्षण मिळेल, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले.
शनिवारी (दि.१२) धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने शहरात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पुढे आंबेडकर म्हणाले, येणारी निवडणूक ही वैदिक हिंदू विरुद्ध संत परंपरा मानणारे हिंदू अशी होणार आहे. धर्मनिरपेक्ष विचारावर ही निवडणूक होणार नसल्याचे भाकीतदेखील त्यांनी व्यक्त केले. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप वगळता इतर सर्व पक्षांसाठी चर्चेसाठी दार उघडे आहेत. मात्र मी कोणाकडेही प्रस्ताव घेऊन जाणार नाही. ज्यांना यायचे त्यांनी माझ्या दारात या, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
जिल्ह्याचे नामांतर झाले असले तरी मुंबई उच्च न्यायालय हे अजूनही औरंगाबाद असाच उल्लेख करते. त्यामुळे मी देखील औरंगाबादच म्हणणार आहे. ज्यांना त्यावर आक्षेप असेल त्यांनी उच्च न्यायालयात शहराचे नामकरण करावे. त्यावेळी आम्हीसुद्धा नवीन नाव घेऊ, असे आंबेडकर म्हणाले. यावेळी त्यांनी छत्रपती संभाजीनगर असा नामोल्लेख देखील टाळला.