Police warning against nylon manja sale-नायलॉन मांजा विक्री केल्यास गुन्हे दाखल करून दुकान परवाने कायमचे रद्द करणार

पोलिस आयुक्तांचा इशारा : पतंग विक्रेते, कुरिअर, ई-कॉमर्स अन् ट्रान्सपोर्ट चालकांची घेतली बैठक
nylon manja
नायलॉन मांजाPudhari
Published on: 
Updated on: 

छत्रपती संभाजीनगर: शहरात निष्पाप नागरिक, दुचाकीस्वार, लहान मुले आणि मुक्या पक्षांच्या जिवावर उठणाऱ्या बंदी असलेल्या प्राणघातक नायलॉन व सिंथेटिक मांजाविरुद्ध शहर पोलिस प्रशासनाने आता 'आरपार'ची लढाई पुकारली आहे. आगामी पतंगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नायलॉन मांजाची साठवणूक, विक्री आणि छुप्या वाहतुकीला मुळापासून संपवण्यासाठी पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि. २६) बैठक पार पडली.

या बैठकीत उपायुक्त (गुन्हे) शशिकांत सातव, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्यासह पतंग विक्रेते, कुरिअर चालक-मालक, ई-कॉमर्स कंपन्यांचे प्रतिनिधी आणि ट्रान्सपोर्ट चालक अशा एकूण ७५ जण उपस्थित होते. नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर पर्यावरण संरक्षण कायदा आणि बीएनएसच्या गंभीर कलमांनुसार गुन्हे दाखल करत दुकानांचे परवाने कायमचे रद्द करण्याचा सक्त इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांची बैठक संपल्याच्या काही तासानंतरच सोमवारी सायंकाळी क्रांती चौक उड्डाणपुलावर मांजामुळे दोन दुचाकीस्वार जखमी झाले होते हे विशेष.

पोलिसांनी नायलॉन मांजा रोखण्यासाठी यंदा विशेष रणनिती आखली आहे. शहरातील वसाहती, मोकळी मैदाने, गल्लीबोळ तसेच घरांच्या गच्चीवर मुले पतंग उडवताना आढळल्यास, पोलिस पथके थेट त्या मुलांकडे जाऊन मांजा तपासणार आहेत. जर त्यांच्याकडे घातक नायलॉन मांजा आढळून आला, तर हा मांजा कोणत्या दुकानातून अथवा कोणाकडून आणला, याची विचारपूस करून संबंधित माहितीच्या आधारे त्या दुकानदारावर व अड्ड्यावर तात्काळ छापा टाकून गुन्हे दाखल केले जाणार आहेत.

केवळ स्थानिक किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई न करता, नायलॉन मांजा शहरात पोहोचवणाऱ्या संपूर्ण पुरवठा साखळीवर प्रहार करण्यात येणार आहे. नायलॉन मांजा तयार करणाऱ्या मूळ कंपन्या, त्यांचे मालक आणि ही घातक सामग्री इतर राज्यांतून किंवा शहरांतून वाहतूक करणाऱ्या घटकांचा गुन्ह्यातील सहभाग तपासून त्यांनाही या गुन्ह्यांमध्ये थेट सहआरोपी केले जाईल, असा इशारा पोलिस आयुक्तांनी दिला आहे.

कोणाचाही जीव धोक्यात घालू नका आपल्या मुलांच्या केवळ क्षणिक मनोरंजनासाठी त्यांच्या हातात नायलॉन मांजा देऊन कोणाचाही जीव धोक्यात घालू नका. तसेच शहरात कुठेही छुप्या पद्धतीने नायलॉन मांजाची साठवणूक अथवा विक्री सुरू असल्यास सुजाण नागरिकांनी त्याची गुप्त माहिती तात्काळ पोलिस प्रशासनाला द्यावी.

- प्रवीण पवार, पोलिस आयुक्त

साध्या सुती धाग्याचीच विक्री करावी

अनेकदा ऑनलाईन मागवून अथवा ट्रॅव्हल्स व ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून मांजा शहरात आणला जातो. ही पळवाट रोखण्यासाठी सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीत विशेष शोध पथके स्थापन करण्यात आली आहेत. संशयित दुकाने, घरे, खाजगी गोदामे, ट्रॅव्हल्स कार्यालये आणि ई-कॉमर्स पार्सल केंद्रांवर अचानक धाडी टाकून तपासणी केली जाईल. कोणत्याही विक्रेत्याने नायलॉन किंवा चायनीज मांजा बाळगू नये. बाजारात केवळ आणि केवळ साध्या सुती धाग्याचीच (मांजा) विक्री करावी. नियमांचे उल्लंघन आढळल्यास दुकानाचा अधिकृत परवाना तत्काळ रद्द करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news