

पैठण : पैठण तालुक्यातील बालानगर शिवारात गोवंश हत्या करून मांस विक्री करणाऱ्या टोळीचा एमआयडीसी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. शुक्रवारी पहाटे करण्यात आलेल्या या धडक कारवाईत पोलिसांनी ५०० किलो गोमांस आणि दोन दुचाकींसह एकूण १ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
बालानगर परिसरातील एका शेतात गेल्या काही दिवसांपासून छुप्या पद्धतीने गोवंश हत्या करून मांस विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर जगदाळे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे उपविभागीय अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचला.
शुक्रवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास पोलीस पथकाने संशयित ठिकाणी छापा टाकला. यावेळी गणी सांडू शेख याच्या शेतात गोवंशाची हत्या करून विक्रीसाठी साठवून ठेवलेले ५०० किलो मांस आढळून आले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत मांस कापण्याचे साहित्य आणि दोन मोटारसायकली जप्त केल्या.
या प्रकरणी पोलिसांनी खालील चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये गणी सांडू शेख, मेहमूद सत्तार शेख, मुजाहीद गणी शेख-कुरेशी, मुस्ताकीम गणी शेख (सर्व रा. बालानगर, ता. पैठण) यांचा समावेश आहे. या मोहिमेत सपोनि ईश्वर जगदाळे, उपनिरीक्षक कविता जगताप, जमादार दिनेश दाभाडे, करतारसिंग सिंगल, भवर आणि रहाटवाड यांच्या पथकाने सहभाग घेतला. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कविता जगताप करत आहेत.