

Police conduct special patrols to search for nylon kite string
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्त-सेवा : नाताळच्या सुट्या आणि आगामी मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर शहरात पतंगबाजीला ऊत येणार आहे. मात्र या आनंदाच्या उत्सवाला नायलॉन मांजाचे ग्रहण लागण्याची भीती आहे. या जीव-घेण्या मांजाच्या विक्रीला आणि वापराला चाप लावण्यासाठी पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. सोमवारी (दि.२२) वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सर्व ठाणेदारांना विक्रेत्यांसह मांजाने पतंगबाजी शोधासाठी गल्लीबोळात, मैदाने, इमारतींवर शोधमोहीम राबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. करणाऱ्यांच्या नाताळच्या सुट्यांमध्ये शालेय विद्यार्थी आणि तरुणांकडून मोठ्या प्रमाणात पतंगबाजी केली जाते.
याचाच फायदा घेत काही विक्रेते चोरट्या मार्गाने नायलॉन मांजाची विक्री करतात. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिस ठाण्यांच्या पथकांना आपापल्या हद्दीत गस्त घालण्याच्या सूचना वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सोमवारी (दि.२२) दिल्या आहेत. संशयास्पद दुकानांची झडती घेतली जाणार असून, साध्या वेशातील पोलिसही मैदानावर लक्ष ठेवून असतील. नायलॉन मांजाची विक्री केवळ पतंग विक्रीच्या दुकानातच होते असे नाही, तर अनेक ठिकाणी किराणा दुकाने किंवा घरातूनही हा घातक मांजा विकला जात असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर, प्रत्येक पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथक आणि विशेष शाखेच्या पोलिसांना आपापल्या हद्दीत गस्त घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
नागरिकांनी सर्तक राहण्याची गरज
मांजापासून रक्षणासाठी दुचाकी चालवताना गळ्यात स्कार्फ किंवा मफलर वापरा. फुल-फेस हेल्मेट वापरा, जेणेकरून डोक्याचेच नव्हे, तर गळ्याच्या वरच्या भागाचेही संरक्षण होते. लहान मुले तुटलेली पतंग पकडण्यासाठी रस्त्यावर धावतात, त्यांच्यावर लक्ष ठेवा. इमारतीवरून पतंग उडवताना तोल जाऊन पडणे, विजेच्या तारांजवळ जाणे असे प्रकार टाळा.
पतंग दुकानांची तपासणी
शहरातील सर्व पतंग विक्रेत्यांच्या दुकानांची अचानक तपासणी होणार. गल्लीबोळातील किराणा दुकाने आणि घरांतून होणाऱ्या विक्रीवर विशेष पोलिस लक्ष ठेवणार आहेत. नायलॉन मांजा विकणे, साठवणे आणि वापरणे हा गुन्हा आहे. त्यामुळे आरोपींवर मनुष्य वधाचा प्रयत्न केल्याच्या गंभीर कलमाखाली गुन्हे नोंद केले जात आहेत. जर कोणी याची विक्री करत असेल तर ११२ नंबरवर पोलिसांना कळवा, असे आवाहन करण्यात आले आहे.