

Police arrest man who made fake documents
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : विदेशातील नागरिकांना गंडा घालण्यासाठी तिथल्या शासनाचे बनावट लेटरपॅड, सिम्बॉलसह न्यायलयाचे बनावट आदेश, बनावट ओळखपत्र तसेच अन्य आवश्यक कागदपत्रे तयार करण्यात तरबेज अस-लेला राजविर प्रदीप वर्मा (२२, रा. वल्लभनगर, ओढाव, अहमदाबाद ) यास पोलिसांनी कारागृहातून ताब्यात घेतले. या प्रकरणात आरोपी संख्या आठ झाली आहे.
चिकलठाणा एमआयडीसी भागात आयआरएस इंटरनल रेव्हेन्यू सर्व्हिसेस इन्व्हेटीगेशन डिपार्टमेंट नावाने बनावट कॉल सेंटरवर पोलिसांनी छापा मारला. विदेशी नागरिकांना गंडा घालणाऱ्या प्रकरणात भावेश चौधरी (३४, रा. अहमदाबाद, गुजरात), भाविक पटेल (२७, रा. मुंबई), सतीश लाडे (३५, रा. अहमदाबाद, गुजरात), वलय व्यास (३३, रा. अहमदाबाद), अजय ठाकूर (२६, रा. मोंढा नाका) आणि मनोवर्धन राठोड (३३, रा. अहमदाबाद, गुजरात) तसेच कॉल सेंटर चालविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजाविणाऱ्या फारूख शहा ऊर्फ फारूखी याला गोव्याहून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर आठव्या आर- ोपीच्या रूपात राजवीर वर्माला अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे कॉल सेंटरचा मास्टरमाइंड व्हर्च्यूव्हल जॉन याची माहिती असलेला पाजी हा वर्माच्या संपर्कात होता. अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान राजविरला न्यायालयाने ८ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांचे एफबीआयला पत्र
या प्रकरणात राजवीर वर्मासह अन्य आरोपीच्या लॅपटॉपचा तपास सुरू आहे. वर्मा याच्या लॅपटॉपमध्ये चौदा विदेशी नागरिकांची नावे सापडली आहेत. सदर पीडित नागरिक असण्याची शक्यता असून, त्यांची माहिती द्यावी, असे पत्र येथील पोलिसांनी अमेरिका येथील तपास यंत्रणा एफबीआयला पाठवले आहे.
नातेवाईकांचीही मदत
शहरात कॉल सेंटर सुरू करण्यासाठी राजवीर वर्माला पाठवण्यात आले होते. बनावट कागदपत्रे बनवण्यात तरबेज असलेल्या राजवीरचे नातेवाईक हे पंजाब, महाराष्ट्र आणि अहमदाबादसह परदेशात राहतात. त्यांच्यापैकी काही जण बोगस कॉल सेंटर चालविण्यासाठी मदत करतात, अशीही माहिती चौकशीत समोर आली आहे. या प्रकरणात राजवीरच्या माध्यमातून जॉनपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न पोलिसांनी सुरू केला आहे.