

Plan to prepare the farm roads before the rainy season
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शेतापर्यंत रस्त्यांची निर्मिती करणारा मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना हा कार्यक्रम आपल्या संपूर्ण विभागात कालबद्ध पद्धतीने राबवून येत्या पावसाळ्याच्या आत विभागात अनेक भागांत शेतांपर्यंत रस्ते तयार व्हावेत या दृष्टीने नियोजन करावे, असे निर्देश विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी आज दिले.
मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना कार्यक्रम राबविण्याबाबत विभागीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेला विभागीय आयुक्त पापळकर यांच्यासह जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, लातूर जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर, नांदेड जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, हिंगोलीचे विवेक गायकवाड, अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते तसेच विभागातील सर्व भूमी अभिलेख अधीक्षक, उपजिल्हाधिकारी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त पापळकर म्हणाले की, शेत रस्ते, पाणंद रस्ते मोकळे झाल्याने ग्रामीण भागातील विकासाला गती मिळेल. शेत रस्त्यांबाबत तंटे, वाद कमी होण्यास वा संपुष्टात येण्यास मदत होईल. हे काम राबवताना त्याचे टप्पे करावे व प्रत्येक टप्प्यावर कालबद्ध कृती करून रस्ते तयार करण्याचे काम सुरू करावे.
जेणेकरून येत्या पावसाळ्यापर्यंत विभागात अनेक ठिकाणी रस्ते मोकळे व तयार झाले पाहिजे. प्रास्ताविक जिल्हाधिकारी स्वामी यांनी केले. डॉ. अनंत गव्हाणे यांनी सादरीकरण करून योजनेची माहिती अधिकाऱ्यांना दिली. प्रविणा कन्नडकर यांनी सूत्रसंचालन केले.