

Permission granted for loudspeakers until midnight tonight during Ganeshotsav
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : गणेशोत्सवानिमित्त विनय गौडा जी. सी. गणेशभक्त व नागरिकांना आनंदोत्सव साजरा करता यावा, यासाठी जिल्ह्यात गुरुवारी (दि. २४) रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक यंत्रांचा वापर करण्यास जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी विशेष परवानगी दिली आहे. त्यामुळे आज जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळांना मध्यरात्रीपर्यंत वाजवा रे वाजवा मनसोक्त आनंद घेता येणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना वर्षात १५ दिवस रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास सूट देण्याचे अधिकार आहेत. त्यात श्री नव सार्वजनिक गणेश मंडळाचे सचिव लक्ष्मी नारायण राठी यांनी पालकमंत्र्यांच्या घोषणेनुसार २० ते २५ सप्टेंबरदरम्यान रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरण्यास परवानगी देण्याची मागणी जिल्हाधिकारी गौडा यांच्याकडे केली होती. त्यावरून जिल्हाधिकाऱ्यांनी उपलब्ध अधिकारांचा वापर करून या २०२६ वर्षात एक दिवस ध्वनिक्षेपकासाठी विशेष सवलतीचा दिवस म्हणून निश्चित केला आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर २४ सप्टेंबर हा दिवस विशेष सवलतीसाठी निश्चित करण्यात आला आहे. मात्र, ध्वनिक्षेपक किंवा ध्वनिवर्धक यंत्रणा वापरण्यापूर्वी सक्षम प्राधिकरणाची लेखी परवानगी घेणे बंधनकारक राहणार असल्याचेही त्यांनी या आदेशात नमुद केले आहे. दरम्यान, इतर दिवशी रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपकांचा वापर करता येणार नाही.
शांतता झोनचे पालन करा
रुग्णालये, शैक्षणिक संस्था आणि न्यायालयांच्या सभोवतालचे किमान १०० मीटर क्षेत्र शांतता क्षेत्र म्हणून निश्चित करण्यात आले आहे. या परिसरात कोणत्याही परिस्थितीत ध्वनिक्षेपक अथवा ध्वनिवर्धक यंत्रांचा वापर करता येणार नाही. त्यामुळे या झोनचे पालन करण्याचे आदेशात नमूद केले आहे.