

पैठण : पुढारी वृत्तसेवा
पैठण तालुक्यात आज (शुक्रवार) विविध महसूल मंडळात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे. या अतिवृष्टीमुळे गेवराई मर्दा येथील पाझर तलाव फुटून शेतकऱ्यांच्या शेतातील लाखो रुपयांच्या पिकाचे नुकसान झाले असून नुकसानीची पाहणी करून पंचनामा करण्याचे तातडीने आदेश तहसीलदार सारंग चव्हाण यांनी संबंधित गावाचे मंडळ अधिकारी व तलाठी यांना दिले आहेत.
शुक्रवारी दुपारपासूनच पैठण तालुक्यातील बिडकीन, पाचोड, बालानगर, कडेठाण, गेवराई मर्दासह अनेक परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. पावसाची संततधार आज (शनिवार) रोजी दुपारी कायम सुरू होती. या पावसामुळे गेवराई मर्दा परिसरातील पाझर तलाव फुटला. यामुळे भागातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवित हानी झालेली नाही महसूल विभागाचे मंडळ अधिकारी शुभांगी शिंदे, तलाठी तोरमकर, सरपंच विक्रम जायभाये, महंमद भाई यांनी नुकसानीचा पंचनामा करण्याची मोहीम हाती घेतली आहे.
दरम्यान शुक्रवारी तालुक्यात झालेल्या पावसाची नोंद आज तहसील कार्यालयात करण्यात आली. त्यानुसार पैठण ५२, पिंपळवाडी पिं ४२, बिडकीन ४६, ढोरकिन ६४,बालानगर ३७, नांदर ४०, आडुळ ८८, पाचोड ८०, लोहगाव ७६, विहामांडवा ४४ मी.मी पाऊस पडला पडला आहे.