Pay Max Global Fraud : १२ वी पास भामट्याचे दुबईत ऑफिस; पे-मॅक्स कंपनीचा मालक अटकेत

३ कोटींचा गंडा, ५० हून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक
Pay Max Global Fraud
Pay Max Global Fraudpudhari photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : गुंतवणुकीवर १२ टक्के परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणारा पे-मॅक्स ग्लोबल कंपनीचा मालक आणि मुख्य सूत्रधाराला आर्थिक गुन्हे शाखेने नाशिकमधून बेड्या ठोकल्या. ज्ञानेश्वर त्र्यंबक दरगुडे (४७, रा. नाशिक) असे या भामट्याचे नाव असून, न्यायालयाने त्याला २५ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी दिली.

दरगुडे आणि टोळीने आतापर्यंत ५० पेक्षा अधिक नागरिकांची ३ कोटींहून अधिक रकमेची फसवणूक केल्याचे तपासात उघड झाले आहे. या गुन्ह्यात यापूर्वी गुरुप्रसाद चव्हाण त्याची पत्नी सुपर्णा (रा. वसई-विरार, ठाणे), सुधाकर खंडागळे, विठ्ठल तांदळे, सोनी मनचंदानी (वसई विरार) यांना अटक करण्यात आली होती. सध्या खंडागळे, तांदळे, मनचंदानी हे हर्मूल कारागृहात आहेत. या साखळीतील मुख्य आरोपी ज्ञानेश्वर दरगुडे मात्र फरार होता. अखेर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला नाशिकमधून शिताफीने अटक केली.

Pay Max Global Fraud
Ashok Kharat case |खरात प्रकरणाचा तपास अंतिम टप्यात, SIT कडून १०५ हून अधिक साक्षीदारांची चौकशी

ही धडक कारवाई आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संभाजी पवार, प्रभारी पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रताप साळवे, अंमलदार अभिजित गायकवाड,विजय नागरे, संदीप जाधव, वर्षा शिरसाठ आणि कृष्णा शिंदे यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा अधिक तपास उपनिरीक्षक प्रताप साळवे करत आहेत.

दुबई, मॉरिशसचे स्वप्न अन् १२ वी पास मास्टरमाइंड

ज्ञानेश्वर दरगुडे हा अवघा इयत्ता १२ वी पास आहे. मात्र, त्याने गेल्या सहा वर्षांपासून थेट दुबईत ऑफिस थाटून लोकांना गुंतवणुकीच्या नावाखाली आपल्या जाळ्यात ओढले. यापूर्वी अटक करण्यात आलेला गुरुप्रसाद चव्हाण आणि त्याची पत्नी सुपर्णा यांनी संभाजीनगरातील ही कंपनी इंटरनॅशनल असल्याचे भासविले होते. १० ते १२ वेगवेगळ्या फर्मच्या खात्यांत पैसे भरण्यास सांगून गुंतवणूकदारांना दुबई, मॉरिशसची स्वप्ने दाखविण्यात आली होती. गुरुप्रसादला १ मे रोजी पालघरमधील आलिशान बंगल्यातून अटक करण्यात आली होती. तर स्वतःच्या खात्यात पैसे घेऊन सेमिनारमध्ये आमिष दाखविणाऱ्या सोनी मनचंदानी हिलाही ५ मे रोजी बेड्या ठोकण्यात आल्या होत्या.

Pay Max Global Fraud
Ashok Kharat Case: सह्या मिसमॅच.. 23 कोटींचे बोगस व्यवहार; सहकार विभागाच्या चौकशीत ‌‘समता‌’मधील सत्यता

अशी उघडकीस आली फसवणूक

पद्मा विश्राम सुस्ते यांच्या फिर्यादीवरून या घोटाळ्याचा पर्दाफाश झाला होता. त्यांचा नातेवाईक विठ्ठल तांदळे याने ओळखीचा गैरफायदा घेत सुस्ते यांना ५ लाखांची गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यानंतर एकापाठोपाठ एक अशा साखळी पद्धतीने बजाज कंपनीतील अनेकांना जाळ्यात ओढण्यात आले. या प्रकरणी २५ मार्च रोजी सिडको ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शहरातील सुमारे ५० जणांना ३ कोटींपेक्षा अधिक रकमेचा या टोळीने गंडा घातला आहे. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news