

छत्रपती संभाजीनगर : पनवेल महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्ताने लग्नाचे आमिष दाखवून शहरातील एका खाजगी नोकरी करणाऱ्या महिलेवर तब्बल आठ वर्षे वारंवार नैसर्गिक व अनैसर्गिक अत्याचार केला. या अत्याचारातून ती महिला तीन वेळा गर्भवतीही राहिली. भारत प्रभाकर राठोड (रा. परळी, बीड ह. मु. पनवेल), विशाल राठोड, राहुल ( रा. उदगीर, लातूर) अशी आरोपींची नावे आहेत. मुकुंदवाडी ठाण्यात ३९ वर्षीय पीडितेने तक्रार दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. भारत राठोड हा पनवेल महापालिकेत अतिरिक्त आयुक्त क्र. २ असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
छत्रपती संभाजी नगरात राहणाऱ्या ३९ वर्षीय महिलेच्या तक्रारनुसार, आरोपी भारत राठोड सोबत तिची ओळख झाली. २०१६ मध्ये त्याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. आरोपीने अनेकदा अनैसर्गिक अत्याचार केले. २०१६ मध्ये एक वेळा आणि त्यानंतर दोन वेळा अशी तीन वेळा पीडिता गर्भवती राहिली. या तिन्ही वेळा आरोपीने बळजबरी तिचा गर्भपात केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच आरोपी विशाल राठोड आणि राहुल यांनी त्याला मदत केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
भारत राठोड उच्चपदस्थ अधिकारी असल्याचा गैरफायदा घेऊन पीडितेला धमकावले. घाबरून तिने त्याच्याविरुद्ध तक्रार केली नव्हती, परंतु त्याने विश्वासघात केल्याचे स्पष्ट झाल्यावर पीडितेने त्याच्यावर बलात्कार, अनैसर्गिक अत्याचार आदी कलमान्वये मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात मंगळवारी तक्रार दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक पुंडलिक डाके करत आहेत.