

छत्रपती संभाजीनगर: शहरातील संवेदनशील असलेल्या पानदरीबा परिसरात बुधवारी (दि.३०) मध्यरात्री तणाव निर्माण झाला. चोरीच्या संशयावरून एका तरुणाला होणारी मारहाण सोडवण्यासाठी गेलेल्या दोघांना जमावाने बेदम मारहाण केली. या घटनेनंतर दोन गट आमनेसामने आल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली, मात्र परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे.
बुधवारी (दि.३०) मध्यरात्री बाराच्या सुमारास पानदरीबा भागात एका तरुणाला चोरीच्या संशयावरून काही जणांनी पकडले आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी त्याच भागातील दोन तरुण मध्यस्थी करून त्याला सोडवण्यासाठी पुढे आले. मात्र, यामुळे जमाव अधिकच संतप्त झाला आणि त्यांनी त्या दोन्ही तरुणांना जबर मारहाण केली. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरली. आपल्या समाजाच्या तरुणांना मारहाण झाल्याचे समजताच, जवळच्या लोटा कारंजा भागातून दुसरा एक गट घटनास्थळी जमा झाला. यामुळे दोन्ही गट आमनेसामने आले आणि मोठा संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली. यानंतर परिसरात तणावपूर्ण शांतता पसरली.
घटनेची माहिती मिळताच सिटी चौक पोलीस ठाण्याच्या निरीक्षक निर्मला परदेशी आणि एपीआय दिलीप चंदन यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली. जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला, पण परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर, काही क्षणांतच आरसीपी (RCP) आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या (SRPF) तुकड्या दाखल झाल्या. सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) संपत शिंदे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविकांत गच्चे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला. जखमी तरुणांना एपीआय दिलीप चंदन यांनी तात्काळ घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. वरिष्ठ पोलीस अधिकारी रात्री उशिरापर्यंत सिटी चौक पोलीस ठाण्यात तळ ठोकून परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.
पानदरीबा आणि लोटा कारंजा या भागांना पूर्वीच्या दंगलींची पार्श्वभूमी असल्याने पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण परिसरात मध्यरात्रीपासूनच कडेकोट बंदोबस्त लावला आहे. क्यूआरटी (QRT), आरसीपी आणि एसआरपीएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी रात्री उशिरा घटनास्थळाची पाहणी करून सुरक्षेचा आढावा घेतला. सध्या परिसरात शांतता असली तरी, वातावरणातील तणाव कायम आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.