

पैठण : सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा, आरोपींना फाशी द्यावी, मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी द्यावी, आदी मागण्यांसाठी पैठण येथे गुरूवारी सर्वपक्षीय व सकल समाजाच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात पैठण तालुक्यातील ग्रामीण भागासह शेवगाव, अंबड, गेवराई, जालना व छत्रपती संभाजीनगर परिसरातील सर्व जातीधर्माचे महिला, पुरुष आंदोलक सहभागी झाले होते.
शहरातील कै. दिगंबरराव कावसानकर स्टेडियम परिसरातून सकाळी बारा वाजता मोर्चाला सुरुवात झाली. मुख्य बाजारपेठेतून खंडोबा चौक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, बसस्थानक चौक, महाराणा प्रताप चौक, सराफा बाजार या मार्गाने हा मोर्चा काढण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मोर्चाचा समारोप झाला. या मोर्चात संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांसह संभाजीराजे छत्रपती, आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर, मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील, शिवसेनेचे शिवराज भुमरे ऑल इंडिया पँथरचे अध्यक्ष दीपक केदार, विनोद पाटील सहभागी झाले होते. या मोर्चा प्रसंगी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक संजय देशमुख, सपोनि सिद्धेश्वर गोरे, शरदचंद्र रोडगे, ईश्वर जगदाळे, सिद्धेश्वर गोरे, पो.कॉ. मनोज वैद्य, नरेंद गायके, राजेश आटोळे, महेश माळी यांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला होता.