

पैठण : पैठण शहरात इंदिरानगर परिसरात अवैधरीत्या देशी भिंगरी दारू विक्री करणाऱ्या विरुद्ध पैठण पोलिसांनी कारवाई करून ३८ हजार ४०० रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार यांच्या सूचनेनुसार गेल्या आठवड्यापासून अवैद्य दारू विक्री करणाऱ्या विरुद्ध मोहीम राबवली जात आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.सिद्धेश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी आपल्या पोलीस पथकाच्या माध्यमातून गांजा, अवैद्य दारू विक्री करणाऱ्या विरुद्ध ही मोहीम राबवली असून रविवारी (दि.१७) रोजी दुपारी पैठण शहरातील इंदिरानगर येथे अवैधरीत्या देशी भिंगरी दारूची विक्री करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
माहिती मिळाल्या नंतर या ठिकाणी छापा मारून सुनील रामराव पवार रा. इंदिरानगर पैठण हे अवैध दारू विक्री करीत असताना आढळून आले. या कारवाईत ३८४ देशी भिंगरी च्या बाटल्या किंमत शंभर रुपये प्रमाणे ३८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस निरीक्षक संजय देशमुख, सपोनि सिद्धेश्वर गोरे,एकनाथ नागरगोजे, बाबासाहेब तांबे, राजेश आटोळे, मनोज वैद्य,दिलवाले यांनी केली. पुढील तपास पोकॉ ठोकळ हे करीत आहेत.