Sant Eknath Maharaj Palkhi Sohala : संत एकनाथ महाराज यांच्या पालखीचे पाटोदानगरीत भव्य स्वागत

दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी
Sant Eknath Maharaj Palkhi Sohala
Sant Eknath Maharaj Palkhi Sohala
Published on
Updated on

पैठण : पंढरपूर येथील आषाढी वारी सोहळ्यासाठी पैठण नगरीतून प्रस्थान झालेल्या आणि वारीत महत्त्वाचे मानाचे स्थान असलेल्या श्रीसंत एकनाथ महाराज यांच्या पालखी पादुका सोहळ्याचे सोमवारी (दि. १३) रात्री आठ वाजता पाटोदा नगरीत आगमन झाले. हा सोहळ्याचा सातवा मुक्काम असून, बीड जिल्ह्यातील पंचक्रोशीत पालखी दाखल होताच तिचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी नाथांच्या पवित्र पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भाविक, विशेषतः महिला भगिनींनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. या पालखी सोहळ्याचे दुसरे रिंगण उद्या पारगाव घुमरे येथे रंगणार आहे.

हा सोहळा ७ जुलै रोजी पैठण नगरीतून पंढरीच्या वाटेवर निघाला होता. छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातून मार्गस्थ होत, सोमवारी हा सोहळा सातव्या मुक्कामासाठी पाटोद्यात दाखल झाला. यावेळी जिल्हा प्रशासनाच्या वतीने तहसीलदार दत्तात्रय निलावाड आणि गटविकास अधिकारी संतोष माने यांच्यासह विविध शासकीय अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी नाथांच्या पादुकांचे मनोभावे पूजन केले.

तसेच, पालखी सोहळा प्रमुख नाथवंशज रघुनाथबुवा गोसावी पालखीवाले आणि अॅड. योगेश महाराज गोसावी पालखीवाले यांच्यासह पंढरीला निघालेल्या सर्व वारकरी व महाराज मंडळींचे प्रशासनातर्फे उत्साहात स्वागत करण्यात आले. सोहळ्याचे दुसरे रिंगण उद्या मंगळवारी (दि.१४) दुपारी पारगाव घुमरे (ता. पाटोदा) या ठिकाणी संपन्न होणार असून या सोहळ्याची जय्यत तयारी ग्रामस्थांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news