

पैठण : मुलाचा खून झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करणाऱ्या आईनेच वीस हजार रुपयाची सुपारी देऊन मुलाचा काटा काढल्याचा प्रकार उघड उघडकीस आला. या संदर्भात पैठण पोलिसांनी आईसह तीन आरोपींना अटक केली आहे.
अधिक माहिती अशी की, पैठण शहरातील संत ज्ञानेश्वर उद्यानातील नाल्यामध्ये दि.१६ रोजी अमोल लक्ष्मण हजारे (वय ३५ रा.नारळा पैठण) याचा चिखलामध्ये मृतदेह आढळून आला होता. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे, पोलीस निरीक्षक संजय देशमुख, सपोनि सिद्धेश्वर गोरे, पोलीस उपनिरीक्षक दशरथ बुरुकुल, एकनाथ नागरगोजे, औदुंबर म्हस्के यांनी भेट देऊन प्रथम पंचनामा केला होता. सदरील व्यक्तीच्या गळ्यावर गळफास लावल्याचे निशाण व वैद्यकीय अहवालावरून हा प्रकार घातपाताचा असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. यासंदर्भात पैठण पोलीस ठाण्यात खून झालेल्या अमोल हजारे याची आई चंद्रकलाबाई लक्ष्मण हजारे हिने तक्रार दाखल केली होती. या खुनाचा तपास करण्यासाठी पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी पोलिसाचे वेगवेगळे पथक तयार करून तपास सुरू केला.
गोपनीय माहितीनुसार सदरील खून किरण रोहिदास गायकवाड (रा. नारळा पैठण), विजय कचरू जाधव (रा. मिटमिटा छत्रपती संभाजीनगर) यांनी केल्याची माहिती प्राप्त झाली. यामुळे या दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केले. या आरोपीकडून सदरील खून कशासाठी व का...? करण्यात आला याबाबत कबुली जवाब घेतला यामध्ये मयत अमोल हजारे याला दारूचे व्यसन होते. यामुळे त्रस्त झालेल्या आईने किरण गायकवाड याला २० हजार रुपयाची सुपारी देऊन अजय याला कायमचं संपून टाकण्याचे ठरविले. यासाठी आईने १८ हजार रुपये दिले राहिलेले दोन हजार रुपये नंतर देण्यात येईल असे सांगितले. यामुळे आरोपी किरण गायकवाड यांनी आपल्या मदतीला विजय कचरू जाधव याला सोबत घेतले व संधी मिळताच अमोलला दारू पिण्याच्या बहाण्याने संत ज्ञानेश्वर उद्यानात नेऊन दोरीच्या साह्याने गळफास लावून खून केला व ओळख पटू नये यासाठी सदरील मयत अमोलच्या तोंडाला चिखल लावून नाल्यात फेकून दिले.
यासंदर्भात पैठण पोलिसांनी मुलाच्या आईसह तीन जणाला अटक केली असून सदरील आरोपीला न्यायालयाने एक दिवस पोलीस कोठडी दिली आहे. या खूनाचा गुन्हा उघडकीस आणण्याची कामगिरी ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ विनयकुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे, पोलीस निरीक्षक संजय देशमुख, सपोनि सिद्धेश्वर गोरे, पैठण पोलीस उपनिरीक्षक दशरथ बुरुकुल, एकनाथ नागरगोजे, औदुंबर म्हस्के, सहाय्यक फौजदार सुधीर ओव्हळ, पोहेकाॅ महेश माळी, राजेश आटोळे, नरेंद्र अंधारे, गायकवाड, ठोकळ, मनोज वैद्य, जिवडे, महिला पोलीस कर्मचारी चेके. शिंदे यांनी कामगिरी केली.