

पैठण पुढारी वृत्तसेवा:- पैठण तालुक्यातील श्री साईबाबा प्रगटभूमी म्हणून ओळख असलेल्या मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तोडफोड करून अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील दानपेटी चोरून नेल्याची घटना गुरुवारी रोजी रात्री घडली. या मंदिरात तीन वर्षांपूर्वी जालना जिल्ह्यातील चोरट्यांनी धुमाकूळ घालून साईबाबा मंदिरातील दानपेटी फोडून चोरी केली होती. पुन्हा या मंदिरा चोरीची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच बिडकीन पोलीस ठाण्याचे सपोनि निलेश शेळके, पोलीस उपनिरीक्षक महेश घुगे जमादार कदम यांचे पथकाने तपास सुरु केला आहे.
अधिक माहिती अशी की छत्रपती संभाजीनगर ते पैठण मार्गालगत असलेल्या श्रीसाईबाबा यांची प्रगट भूमी धुपखेडा येथे चोरट्यांनी गुरुवारी रात्री मंदिराचे सीसीटीव्ही कॅमेरे तोडफोड करून बंद केले. चोरट्यांनी दानपेटी चोरून नेली. ही घटना शुक्रवारी रोजी पहाटे उघडकीस आली. दरम्यान तीन वर्षांपूर्वी धुपखेडा येथील श्रीसाई बाबा मंदिरातील दानपेटी गॅसकटरच्या साह्याने तोडून चोरी केल्याची घटना घडली होती अशी माहिती मंदिर समितीचे प्रमुख पांडुरंग वाकचौरे यांनी दिली. याच दिवशी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या ढोरकीन येथे एका बँकेचे एटीएम मशीन चोरट्यांनी पळून नेल्याची घटना घडली होती. सदरील चोरटे जालना जिल्ह्यातील असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते.