

पैठण : शहरातील इंदिरानगर परिसरात १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याच्या प्रकरणातील फरार आरोपी, शिवसेना (शिंदे गट) नगरसेवक ईश्वर भाऊसाहेब दगडे हा बुधवारी (दि. १०) सायंकाळी स्वतःहून पैठण पोलीस ठाण्यात हजर झाला. रात्री उशिरा नगरसेवक ईश्वर दगडे याला वैद्यकीय तपासणीसाठी छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले असून, त्याला अटक करण्याची प्रक्रिया सुरू होती.
नेमकी घटना काय? शहरातील इंदिरानगर परिसरात राहणारा अमोल देविदास अहिरे हा अल्पवयीन युवक तहसील रोडवरील बगळा चौकातील एका दवाखान्यासमोर उभा होता. मंगळवारी (दि. २ जून) इंदिरानगर गल्लीतीलच एका अल्पवयीन मुलासोबत त्याचा वाद झाला. या वादातून संबंधित अल्पवयीन मुलाने अमोल अहिरे याच्यावर धारदार चाकूने हल्ला केला. आरोपीने छातीवर गंभीर वार केल्याने अमोल रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्याला तातडीने शहरातील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
८ दिवसांनंतर नगरसेवक हजर या घटनेनंतर पैठण शहरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तातडीने कारवाई करत या प्रकरणातील दोन संशयित आरोपींना अटक केली होती. मात्र, या गुन्ह्यात आरोपी असलेला शिवसेना शिंदे गटाचा नगरसेवक ईश्वर भाऊसाहेब दगडे हा तेव्हापासून फरार होता. घटनेच्या आठ दिवसांनंतर हा फरार नगरसेवक स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी त्याला वैद्यकीय तपासणीसाठी छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात पाठवले असून, रात्री उशिरापर्यंत अटकेची कायदेशीर प्रक्रिया सुरू होती.
या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील आणि पोलीस निरीक्षक महादेव गोमारे करत आहेत.