

पिंपळवाडी : पैठण औद्योगिक वसाहत पोलिसांनी दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावत शनिवारी (दि.११) रात्री ९ वाजता कारवाई करत सात चोरट्यांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून चोरीच्या सहा दुचाकी जप्त केल्या आहेत. जप्त वाहनांची अंदाजे किंमत तीन लाख रुपये आहे.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये आबासाहेब खुने (रा. ढोरकीन ), जीवन गिऱ्हे (रा. गणेशनगर, पिंपळवाडी), महेश लहाळे (रा. इसारवाडी), सागर जाधव (रा. गणेशनगर, पिंपळवाडी), समीर शेख (रा. ढोरकीन ) आणि शुभम गुंड (रा. इसारवाडी, ता. पैठण) यांचा समावेश आहे.
औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असतानाच ही कारवाई करण्यात आली. पांडुरंग श्रीकिसन वीर (रा. वाहेगाव, ता. पैठण) यांची दुचाकी (एमएच : २० : एपी : २०५६) ही दुचाकी चोरीस गेल्याप्रकरणी पोलिसांनी तपास केला.
तपासादरम्यान पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांच्या ताब्यातून चोरीच्या ६ दुचाकी जप्त करण्यात आल्या. तसेच आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार दुचाकी चोरीच्या साखळीचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले.