

पैठण : पैठण शहरातील बडजाते हॉस्पिटलजवळ रविवारी दुपारी एसटी बस आणि दुचाकीची भीषण धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जणांसह अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
प्राथमिक माहितीनुसार, शेवगावकडून पैठणच्या दिशेने येणारी एमएच-06 बीडब्ल्यू-4369 क्रमांकाची एसटी बस बडजाते हॉस्पिटलजवळ आली असताना एमएच-20 जीए-2979 क्रमांकाच्या दुचाकीला धडकली. धडक एवढी भीषण होती की, दुचाकीवरील तिघांना गंभीर दुखापत झाली.
अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. मात्र, या दुर्घटनेत अशोक रमेश भोसले (वय 33, रा. अंतरवाली राठी, जि. जालना) आणि कृष्णा अशोक गायकवाड (वय 23, रा. राक्षी, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर) यांच्यासह अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पैठण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा पंचनामा केला. अपघातग्रस्त एसटी बस पोलिसांनी ताब्यात घेतली असून ती पैठण पोलीस ठाण्याच्या आवारात लावण्यात आली आहे. मृतदेह पुढील वैद्यकीय व कायदेशीर कार्यवाहीसाठी शासकीय घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.