

Padaswan murder case should be tried in fast track court: Adv. Ambedkar
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : संभाजी कॉलनीतील पाडसवान कुटुंबीयांवरील हल्ला ही भयानक क्रूरता आहे. शासनाने आणि पोलिसांनी कठोर पावले उचलणे आवश्यक असून, हा खटला तातडीने फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, अशी मागणी शुक्रवारी (दि.२९) करत या प्रकरणी पोलिसांच्या भूमिकेवर वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
अॅड. प्रकाश आंबेडकर एका पुस्तकाच्या प्रकाशनासाठी शुक्रवारी शहरात आले होते. त्यावेळी त्यांनी सिडकोतील पाडसवान कुटुंबाची भेट घेत त्यांची सांत्वना केली. त्यांनी हल्ला करणाऱ्या कुटुंबाने अत्यंत क्रूर पद्धतीने हल्ला करून प्रमोद पाडसवान यांचा खून केला. या कुटुंबातील तीन सदस्य गंभीर जखमी आहेत. यातील आरोपींविरोधात वारंवार तक्रारी केल्यानंतरही पोलिसांनी कारवाई केली नाही, म्हणून आरोपींची खुनापर्यंत मजल गेली आहे. यावेळी त्यांनी पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत आपली भूमिका स्पष्ट केली.
हल्ल्याचा व्हिडिओ पाहिला तर आरोपींची भयानक क्रूरता दिसून येते. पोलिसांनी अगोदरच दिलेल्या तक्रारीकडे लक्ष दिले असते तर अशी घटना घडली नसती. आता पोलिसांनी तात्काळ साक्षीदारांचे जबाब नोंदवून हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा आणि लवकरात लवकर निकाल लागेल याची खबरदारी घ्यावी. आज वाळूमाफिया, पाणीमाफिया आणि इतर टोळ्यांचा बंदोबस्त न केल्यास कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल. शासन व पोलिसांनी कठोर पावले उचलणे गरजेचे आहे. मनोज जरांगे आणि लक्ष्मण हाके यांच्या भूमिकेबद्दल मात्र त्यांनी नो कॉमेंट्स असे उत्तर देत प्रश्नाला बगल दिली.