Sambhajinagar hostel grant scam : आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या एक कोटीच्या अनुदानावर डल्ला

खोटे भाडे, बनावट पावत्यांद्वारे स्वतःसह नातेवाइकांच्या खात्यात वळवली रक्कम
Crime News
Crime Newspudhari photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या पोषण आहार आणि वसतिगृहासाठी शासनाकडून आलेल्या अनुदानावर डल्ला मारत तब्बल १ कोटीहून अधिक रुपयांचा अपहार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी ‘मराठवाडा बंजारा सेवा संघा’चे तत्कालीन कोषाध्यक्ष पंडीत भिका जाधव आणि त्याचा मुलगा प्रमोद जाधव या दोघांविरुद्ध न्यायालयाच्या आदेशाने चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुरुवारी (दि.१६) फसवणूक व अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी मराठवाडा बंजारा सेवा संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र गुलाबसिंग जाधव (६०, रा. खोकडपुरा) यांच्या तक्रारीनुसार, ते २००३ पासून मराठवाडा बंजारा सेवा संघाचे सदस्य आहेत. २०२५ पर्यंत ते संस्थेचे अध्यक्ष तर सध्या उपाध्यक्ष आहेत. या संस्थेमार्फत कचनेर तांडा (ता. जि. छत्रपती संभाजीनगर) येथे प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा चालवली जाते. या शाळेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या पोषण आहार, वसतिगृह व उत्तर सोयी-सुविधांसाठी शासनाकडून अनुदान मिळते.

हे अनुदान जुना मोंढा येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या खात्यात जमा होत असे. मात्र संस्थेचे तत्कालीन कोषाध्यक्ष पंडित जाधव यांनी पदाचा गैरवापर करत जुलै २०१७ ते एप्रिल २०२२ या कालावधीत अनुदानाची मोठी रक्कम शाळेच्या कामासाठी न वापरता परस्पर हडप केली. पंडीत जाधव यांनी ही रक्कम स्वतःच्या, पत्नीच्या, मुलाच्या (प्रमोद जाधव) आणि इतर नातेवाइकांच्या बँक खात्यात वळवली आणि रोखीनेही काढून घेतली.

या मोठ्या गैरव्यवहाराबाबत राजेंद्र जाधव यांनी संबंधित कार्यालयांकडे दाद मागितली, परंतु कोणतीही कारवाई न झाल्याने त्यांनी थेट न्यायालयात धाव घेतली होती. अखेर न्यायालयाच्या आदेशानुसार गुरुवारी (दि.१६) चिकलठाणा पोलिस ठाण्यात तत्कालीन कोषाध्यक्ष पंडित भिका जाधव आणि त्यांचा मुलगा प्रमोद पंडित जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दीपक पारधे हे करत आहेत.

असा उघडकीस आला १ कोटीचा घोटाळा

संस्थेचे ऑडिट, बँक स्टेटमेंट आणि धर्मादाय आयुक्त कार्यालयातील नोंदी तपासल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. कोषाध्यक्ष पंडित जाधव यांनी मुलगा प्रमोद, पत्नी सुमनबाई यांच्यासह गणेश चव्हाण, मनोज चव्हाण आणि प्रभाबाई चव्हाण यांच्या बँक खात्यांत अनुक्रमे ४ लाख ५४ हजार, ४९ लाख आणि ५१ लाख ९५ हजार ५५२ रुपये वळवल्याचे बँक स्टेटमेंटवरून स्पष्ट झाले आहे.

बनावट पावत्या अन् खोटे भाडे

शाळेच्या इमारतीचे खोटे भाडे दाखवण्यात आले. प्रभाबाई चव्हाण यांच्या नावे भाडे दिल्याच्या पावत्या दाखवल्या, परंतु त्या पावत्यांवर कुणाचीही स्वाक्षरी किंवा शिक्का नव्हता. तसेच काही वर्षांच्या पावत्याही गहाळ करून बनावट कागदपत्रे तयार केल्याचे समोर आले.

ठरावाविना मनमानी कारभार

या सर्व लाखो रुपयांच्या व्यवहारांसाठी संस्थेच्या कार्यकारिणीचा कोणताही ठराव, खर्चाची मूळ बिले किंवा पावत्या उपलब्ध नाहीत. लेखापरीक्षण अहवालातही आर्थिक अनियमितता, आवश्यक नोंदींचा अभाव, खर्चाचे पुरावे उपलब्ध नसल्याचे स्पष्ट निरीक्षणे नोंदविण्यात आली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news