

छत्रपती संभाजीनगर: उमेश काळे | मराठवाडा आणि खानदेशाला जोडणारा औट्रम घाट हा गेल्या काही वर्षांपासून नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड आणि जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव दरम्यान असलेला हा घाट गौताळा अभयारण्य क्षेत्रात असल्यामुळे निसर्गसंपन्न आहे.
British officer: Sir James Outram
कन्नड घाट, चाळीसगाव घाट, गौताळा घाट अशी विविध नावे या घाटाला असली तरी औट्रम हेच नाव अधिक प्रचलित आहे. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या या घाटावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी भुयारी मार्गाचा विचार सुरू आहे.
रेल्वे आणि रस्ते वाहतुकीसाठी एकत्रित प्रस्ताव मांडण्यात आला असून, मंगळवारी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. प्रस्तावित बीड-चाळीसगाव मार्गासाठी बोगद्याचे काम होणार असून त्यासाठी ७,००० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या घाटाचा उपयोग विकासकामासाठी जरी केला जात असला, तरी औट्रम घाटाचा इतिहास ब्रिटिश काळाशी निगडित आहे.
सर जेम्स औट्रम हे इस्ट इंडिया कंपनीत वयाच्या २२व्या वर्षी नोकरीला लागले. त्यांची पहिली नियुक्ती खानदेशातील धरणगाव येथे झाली. तेव्हा धरणगाव येथूनच खानदेशचा कारभार चालवला जात असे. प्रारंभी एका छोट्या घरात राहणाऱ्या औट्रमयांनी तेथे बंगला बांधला.
१८२५ ते १८३६ या काळात औट्रम धरणगावात वास्तव्यास होते. त्यांना कोणतेही काम करावयाचे झाल्यास भिल्लांशी सामना करावा लागत असे. गौताळा जंगलात जाणे अत्यंत अवघड होते. या समस्येवर उपाय म्हणून औट्रमने भिल्लांना शासकीय सेवेत घेण्यास सुरुवात केली. बॉडीगार्ड आणि तपासणी नाक्यांवर भिल्लांची नियुक्ती केली. पुढे भिल्लांची स्वतंत्र फौज स्थापन करून सैन्यातही त्यांना सामील केले. साहजिकच, काही वर्षांनंतर हा घाट औट्रम यांच्या नावाने ओळखला जाऊ लागला.
१८७० साली खानदेशात पडलेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर घाटाची दुरुस्ती करण्यात आली. खडीकरण, मजबुतीकरण इत्यादी कामांवर २०,००० रुपयांचा खर्च करण्यात आला. त्यावेळचे कलेक्टर एशबर्नर यांनी या घाटाचे उद्घाटन केले आणि औट्रमचे नाव अधिकृतरित्या घाटाला देण्यात आले.
खानदेशातील सेवा पूर्ण झाल्यानंतर औट्रमने कोलकत्ता, लखनौ आणि इस्ट इंडिया कंपनीच्या अधिपत्याखाली असलेल्या इतर देशांत पायाभूत सुविधांवर काम केले. लंडन आणि कोलकत्त्यात त्याचे पुतळे असून, सिंगापूर आणि दिल्लीतील रस्त्यांनाही त्याचे नाव देण्यात आले आहे.
पाच वर्षांपूर्वी धरणगाव येथे आरोग्य रुग्णालयाचे बांधकाम करताना इंग्रजी भाषेतील एक शिलालेख सापडला. त्यात मराठीत १५ आणि इंग्रजीत १८ ओळी आहेत.
औट्रम ब्रिटन सोडून प्रथम भारतात आला, तेव्हा त्याची प्रकृती नाजूक होती. मात्र, खानदेशातील मातीने त्याला धष्टपुष्ट बनवले. सैन्यदलातही त्याने आपली छाप सोडली. ११ मार्च १८६३ रोजी फ्रान्समध्ये त्याचे निधन झाले. त्याच्या समाधीवर "The Bayard of India" असे लिहिलेले आहे.