

Only twenty percent water storage remains in the Lower Dudhana Project
बालाजी कुलकर्णी
मंठा : निम्न दुधना प्रकल्पात केवळ वीस टक्के पाणीसाठा उपलब्ध असून धरणातील पाणी उपसा वर बंदी घालण्यात आली असली तरी पण उपसा सुरूच असल्याने येणाऱ्या काळात पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करण्याची वेळ तालुक्यातील नागरिकांवर येऊ शकते.
या वर्षात पावसाने पाठ फिरवल्याने निम्न दुधना धरणात केवळ २० टक्के जिवंत पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. मंठा तालुक्यातील खोराड सावंगी साठवण तलावात २५ टक्के, तळतोंडी साठवण तलावात केवळ १०टक्के आणि पाटोदा तलावात १५ टक्के पाणी साठा आहे. या तिन्ही साठवण तलावात या पावसाळ्यात नद्याला एकदा ही पुर आलाच नसल्याने नवीन पाणी आलेच नाही.
या पार्श्वभूमीवर जालना जिल्हा प्रशासनाने धरणातील संपूर्ण पाणीसाठा केवळ पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तसेच धरणाच्या ३२ किलोमीटरच्या बॅकवॉटर क्षेत्रात शेती व फळबागांसाठी होणारा बेकायदेशीर पाणी उपसा तात्काळ बंद करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. तरी पण शेकडो कृषी पंपाच्या साहाय्याने शेती साठी पाणी उपसा सुरूच आहे. याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष आहे.
मंठा व परतूर या दोन्ही तालुक्यातील परिसरात अपुरा पाऊस झाल्याने निम्न दुधना प्रकल्पातील जलसाठ्यात मोठी घट झाली आहे. मोसमी पाऊस परत फिरल्याने आगामी काळात पावसाची शक्यता नसल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी पाण्याचे काटेकोर नियोजन करण्याचे आदेश दिले आहेत.
या धरणावर परतूर, सातोना, मंठा ही शहरे तसेच मंठा तालुक्यातील २५ ते ३० ग्रामीण गावांची पिण्याच्या पाण्याची भिस्त आहे. परभणी जिल्ह्यातील सेलू, मानवत या शहरासह या दोन्ही तालुक्यातील अनेक खेडी याच धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे उपसा बंदीचा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
प्रशासनाने आदेश दिले असले तरी प्रत्यक्ष अंमलबजावणी हे मोठे आव्हान आहे. पाटबंधारे विभागाकडे केवळ ३३ कर्मचारी असून, ३२ किमीच्या विस्तीर्ण बॅकवॉटर क्षेत्रात होणारा अनधिकृत उपसा रोखणे कठीण आहे. केवळ कागदोपत्री आदेश न राहता प्रत्यक्षात कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, परभणी, मानवत व सेलू तालुक्यातील नदीकाठच्या ४०-४५ गावांना या निर्णयामुळे पिण्याच्या पाण्यासाठी मोठा दिलासा मिळणार आहे. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देत प्रशासनाने घेतलेला हा निर्णय स्वागतार्ह असला तरी, बेकायदेशीर उपसा पूर्णपणे थांबवण्यासाठी कठोर कारवाईची गरज असल्याची मागणी अनेक गावातील नागरिकांमधून होत आहे.
२०२४ सारखी परिस्थिती टळणार
सन २०२४ मध्ये धरणात केवळ मृत साठा शिल्लक होता. त्यावेळी परतूर, मंठा सातोना सेलू, मानवत, शहरांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागले होते. यंदा २० टक्के जिवंत साठा असल्याने योग्य नियोजन केल्यास ती भीषण परिस्थिती टळू शकते, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.