

One month's stipend for all corporators to help drought victims
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: मराठवाड्यासह राज्याच्या विविध भागांत दुष्काळाची तीव्रता वाढत असताना दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी महापालिकेतील नगरसेवकांनी पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला असून सर्व नगरसेवकांचे एका महिन्याचे मानधन दुष्काळ निधीसाठी देण्यात येणार आहे. याबाबत स्थायी समितीचे सभापती अनिल मकरिये हे मनपा आयुक्तांना पत्र देणार असल्याची माहिती बुधवारी (दि. ३०) महापौर समीर राजूरकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
राज्यात पावसाने ओढ दिल्याने अनेक भागांमध्ये दुष्काळाची परिस्थिती गंभीर बनली आहे. पावसाळ्याचे ५५ दिवस उलटूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे खरीप हंगामावर त्याचा परिणाम झाला आहे. तसेच अनेक भागांत पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. यासंदर्भात राज्य शासनाने पहिल्या टप्प्यात २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करून आवश्यक उपाययोजना सुरू केल्या आहेत.
मराठवाड्यात दुष्काळाची तीव्रता अधिक असल्याने या भागातील नागरिकांच्या मदतीसाठी महापालिकेने सामाजिक बांधिलकीतून एका महिन्याचे मानधन दुष्काळ निधीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. महापौर समीर राजूरकर यांच्या दालनात बुधवारी दुष्काळी परिस्थितीबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी स्थायी समिती सभापती अनिल मकरिये, सभागृह नेता गोविंद केंद्रे, विरोधी पक्षनेता समीर साजीद बिल्डर, वंचितचे अफसर खान यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या गटनेत्यांची या बैठकीस उपस्थिती होती.
दरम्यान, दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांच्या नगरसेवकांचे एका महिन्याचे मानधन देण्याचा निर्णय गटनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच दुष्काळाच्या संकटात नागरिकांच्या मदतीला धावून जाण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. ही सामाजिक बांधिलकी जपत नगरसेवकांचे मानधन दुष्काळ निधीसाठी देण्यात येणार असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले.
पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आवाहन
दुष्काळी परिस्थितीत पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे. मात्र, शहरातील काही भागांत वाहने आणि रस्ते, ओटे धुण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर होत आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याची नासाडी टाळून उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि पाणी बचतीला प्राधान्य द्यावे, असे आवाहन महापौर समीर राजूरकर यांनी सांगितले.