

Old Woman robbed by promising free ration
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा
मंदिरात दर्शनासाठी निघालेल्या वृद्ध महिलेला मोफत रेशन, कपडे आणि दोन हजार रुपये घेऊन देतो माझ्यासोबत चला, असे म्हणत दोन भामट्यांनी लुबाडले. तिच्या गळ्यातील साडेपाच ग्रॅमची पोत हातचलाखीने लांबविली. ही घटना शनिवारी (दि. २८) सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास शहागंज भागात घडली.
फिर्यादी कमलबाई सुरेश पाडळकर (६०, रा. शहागंज) यांच्या तक्रारीनुसार, त्या सायंकाळी महादेव मंदिर, शहागंज मंडी येथे पायी निघाल्या होत्या. घरापासून थोड्या अंतरावर पेट्रोलपंप परिसरात गेल्यानंतर एक व्यक्ती त्यांच्याजवळ आला. माझ्यासोबत चला तुम्हाला मोफत रेशन, गहू, तांदूळ, कपडे आणि दोन हजार रुपये घेऊन देतो अशी थाप मारू लागला.
त्याला कमलबाई यांनी मला नाही लागत असे म्हणून नकार दिला. मात्र, भामट्याने तुम्हाला लागत नसेल तर घेऊन गरिबांना द्या असे म्हणत त्यांना शंभर रुपये दिले. त्यानंतर कमलबाई यांनी त्याला होकार दिल्यानंतर तो त्यांना डॉ. दरक यांच्या दवाखान्याजवळ घेऊन गेला.
एका कॉफी दुकानाच्या पायरीवर बसविले. तेथे त्याचा एक साथीदार उभा होता. दोघेजण एकमेकांना बोलत होते. त्यानंतर वयस्कर इसमाने कमलबाई यांना तुमच्या गळ्यातील सोन्याची पोत पाहिल्यावर मालक रेशन देणार नाही असे म्हटले. त्यामुळे कमलबाई यांनी साडेपाच ग्रॅमची पोत काढून पिशवीत ठेवली.
भामट्याने त्यांची पिशवी घेऊन गाठ मारल्याचा बहाणा करून पोत हातचलाखीने काढून घेत पिशवी कमलबाई यांच्याकडे देऊन तेथून पसार झाले. बराच वेळ वाट पाहूनही भामटा वापस आला नाही. त्यानंतर पिशवी उघडून पहिली तर पोत दिसून आली नाही. या प्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक वैष्णव करत आहेत.
कमलबाई यांना थाप मारून बाजूला घेऊन जाताना पांढरा शर्ट घातलेला भामटा सीसीटीव्हीत कैद झाला आहे. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.