

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील विविध सरकारी कार्यालयांमध्ये सर्रासपणे अधिकारी-कर्मचारी यांचे वाढदिवस साजरे केले जातात. नागरिकांना बाहेर ताटकळत ठेवून आत केक कापला जातो. परंतु यापुढे सरकारी कार्यालयात वाढदिवस साजरे केल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा थेट इशाराच जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिला आहे.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी याबाबत परिपत्रकच जारी केले आहे. जिल्ह्यात महसूल, कृषी, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महावितरण, जलसंपदा, जलसंधारण, सिडको, नगर परिषदा, पोलिस, सार्वजनिक आरोग्य, पशूसंवर्धन विभाग, शिक्षण, सहकार, समाजकल्याण अशा विविध सरकारी खात्यांची कार्यालये आहेत. या कार्यालयांमध्ये कामानिमित्त दररोज असंख्य नागरिक येत असतात. परंतु काही वेळा कार्यालयीन वेळेतच अधिकारी कर्मचारी यांचे वाढदिवस साजरे केले जातात. केक कापला जातो. तोपर्यंत नागरिकांना बाहेर ताटकळत थांबावे लागते.
नियमानुसार कोणत्याही शासकीय कार्यालयात वाढदिवस किंवा इतर प्रकारचे उत्सव साजरे करता येत नाहीत. तरीदेखील या नियमाकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी त्याची गंभीर दखल घेत परिपत्रकच जारी केले आहे. यापुढे कोणत्याही सरकारी कार्यालयात अशा पद्धतीने कार्यालयीन वेळेत अधिकारी किंवा कर्मचारी यांचे वाढदिवस साजरे करू नयेत. तसे आढळून आल्यास संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा स्वामी यांनी दिला आहे.
जिल्ह्यातील महसुली कार्यालयांमध्ये अधिकारी कर्मचारी वेळेवर येत नसल्याच्या तक्रारी होत्या. त्यामुळे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी महिनाभरापूर्वी एकाच दिवशी सर्व महसुली कार्यालयांमध्ये सकाळी सर्व कर्मचाऱ्यांची उपस्थिती घेतली. सर्व महसुली कार्यालयांमध्ये एकूण १२८ कर्मचारी उशिराने कार्यालयात आल्याचे समोर आले. त्या सर्व कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार कपात करण्यात आला असून त्याची संबंधित कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तिकेतही नोंद घेतली असल्याचे जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले.
अनेक सरकारी कार्यालयात अधिकारी, कर्मचारी यांचे वाढदिवस साजरे होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे कामानिमित्त कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना ताटकळत बसावे लागते. म्हणून यापुढे कोणत्याही कार्यालयात अधिकारी किंवा कर्मचारी यांचा वाढदिवस साजरा झाल्याचे समोर आल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाईल.
दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी