

छत्रपती संभाजीनगर : मुख्य बसस्थानकांतून प्रवाशांची पळवापळवी होत असल्यामुळे ई बसला प्रवासी मिळत नसल्याची तक्रार नाशिकच्या एका वाहकाने येथील मुख्य बसस्थानकातून थेट परिवहन मंत्र्यांकडे केली. याची दखल घेत परिवहन मंत्र्यांनी फोन करताच अधिकाऱ्यांना घाम फुटला. अधिकाऱ्यांनी आपल्यावरील बालंट दूर करण्यासाठी एका खासगी एजंटाविरूद्ध क्रांतीचौक पोलिसांत तक्रार दिली. ही घटना बुधवारी (दि.१०) दुपारी घडली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
नाशिकहून सकाळी छत्रपती संभाजीनगरात आलेली ई शिवाई बस दुपारी परतीच्या मार्गावर जाण्यासाठी प्लॅटफॉर्मवर लावण्यात आली. प्रवासीच मिळत नसल्याने बस तेथेच थांबली. वाहकांने प्रयत्न करून सात ते आठ प्रवासी मिळवले. याच दरम्यान एका खासगी बसच्या एजंटाने तेही प्रवासी पळवले. या घटनेचा व्हिडिओ संबंधित वाहकाने बनवला. त्यानंतर त्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली, परंतु त्याला अधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळत नसल्याने, त्याने थेट व्हिडिओ परिवहन मंत्र्यांना पाठवला. असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
एजंटाविरुद्ध कारवाईची मोहीम
वाहकाने केलेल्या तक्रारीची तपासणी केली, तसे काही घडले नाही. एक एजंट बसस्थानकात फिरत होता. त्याच्या विरुद्ध तक्रार केली आहे. आता एजंटाविरुद्ध कडक मोहीम हाती घेतली असल्याची माहिती विभाग नियंत्रक प्रमोद नेहूल यांनी दिली. या घटनेमुळे बसस्थानकांवर एजंटाचा वावर असल्याची कबुलीच अधिकाऱ्यांनी दिली. मुख्य बसस्थानकांसह इतर बसस्थानकांत सकाळपासूनच गराडा पडलेला असतो. परंतु बसस्थानक प्रमुखांसह इतर अधिकारी याकडे कानाडोळा करत असल्याने त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
मंत्र्यांचा फोन, अधिकारी घामाघूम
दरम्यान या प्रकरणी परिवहन मंत्र्यांनी फोन करून याबाबत विचारणा केली. या दरम्यान या प्रकरणांवर पडदा टाकण्याची पूर्ण तयारी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्यांना घाम फुटला. आपल्या अंगावर बालंट येत असल्याचे पाहून सायंकाळी एका खासगी एजंटाविरुद्ध क्रांतीचौक पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याची माहिती समोरआली आहे.
चर्चेला उधाण
संबंधित वाहक हा परिवहन मंत्र्याचा नातेवाईक असल्याने वरिष्ठपातळीवरून फोनाफोनी झाली. हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू असून, हे मुख्य बसस्थानकातील अधिकाऱ्यांच्या अंगलट येण्याची शक्यता असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.