

छत्रपती संभाजीनगर : नांदेड विभागातील रेल्वे सुरक्षा दलाने जून २०२६ या महिन्यात धडक माेहीम राबवत लाखाे रुपयांचा ऐवज जप्त केला. त्याचबरोबर अल्पवयीन मुूलांच्या सुटकेसह चोरट्यांनाही चांगलाचा दणका दिला आहे. रेल्वे प्रवाशांची सुरक्षा, रेल्वे मालमत्तेचे संरक्षण, हरविलेल्या व्यक्ती व मालमत्तेचा शोध यात सुरक्षा दलाने लक्षवेधी कारवाई केली आहे.
रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने या वर्षाच्या केवळ जून महिन्यात ऑपरेशन नन्हे फरिश्ते अंतर्गत ३ अल्पवयीन मुलांची सुरक्षित सुटका करून त्यांना बाल कल्याण समितीच्या स्वाधीन केले. तर ऑपरेशन अमानत अंतर्गत हरविलेल्या मालमत्तेच्या १० घटनांमध्ये सुमारे २ लाख ५ हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज शोधून संबंधित प्रवाशांच्या स्वाधिन केला.
तसेच ऑपरेशन यात्री सुरक्षा अंतर्गत प्रवाशांच्या सामान चोरी संदर्भातील १७ गुन्ह्यांचा उलगडा करून २२ संशयित आरोपींना ताब्यात घेत त्यांच्या ताब्यातून १ लाख ९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
११ आरोपींना अटक
ऑपरेशन रेल सुरक्षा अंतर्गत रेल्वे मालमत्तेच्या चोरीसंदर्भात ४ गुन्हे नोंदवून ११ आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून ८ लाख २७ हजार ९९ रुपये किंमतीची रेल्वे मालमत्ता जप्त केली. रेल्वे अधिनियम अंतर्गत विविध कलमांनुसार ३४१ प्रकरणांमध्ये २८४ जणांविरुद्ध कारवाई करून ३२ हजार ५३५ रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच जन विश्वास अधिनियम अंतर्गत ११८ जणांविरुद्ध कारवाई करून ८४ हजार रुपये दंड आकारण्यात आला.रेल्वे सुरक्षा दलाची ही कारवाई केवळ जून या महिन्यांतील आहे. विविध आॅपरेशनच्या माध्यमांतून नियमित कारवाई सुरूच असल्याची माहिती सूरक्षा दलाच्या वतीने देण्यात आली.