Nana Patekar Naam Foundation : गाव दत्तक घेतलं, माणसं आपली केली; नानांच्या जाण्याने धोंदलगाव सुन्न!

‘नाम’ फाउंडेशनने सर्वप्रथम दत्तक घेतलेले गाव! नाना पाटेकरांच्या जाण्याने झाले पोरके, धोंदलगावकरांसाठी ‘आपला नाना’, प्रत्‍येकाच्या डोळ्यात तरळले अश्रू
Nana Patekar
Nana Patekar
Published on: 
Updated on: 

फैसल पटेल

Naam Foundation वैजापूर: ज्यांच्या घरात नानांनी चहा घेतला, ज्यांना नावाने हाक मारली आणि ज्यांच्या गावाच्या पाण्याची चिंता त्यांनी आपल्या माणसासारखी केली, त्या नानांच्या जाण्याची बातमी धोंदलगावकरांच्या काळजाला चटका लावून गेली. पडद्यावर हजारो भूमिका जगलेला हा कलाकार धोंदलगावसाठी मात्र अभिनेता नव्हता; तो गावाच्या सुख-दुःखात सहभागी होणारा आपला माणूस होता. दहा वर्षांपूर्वी दुष्काळाच्या छायेत असलेल्या या गावाला नानांनी केवळ दत्तक घेतले नाही, तर त्याच्या पाण्याचा आणि भवितव्याचा प्रश्न स्वतःचा मानला. आज त्याच माणसाच्या जाण्याने धोंदलगाव सुन्न झाले आहे.

मराठवाड्यातील भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी ‘नाम’ फाउंडेशनची स्थापना केली. फाउंडेशनने सर्वप्रथम दत्तक घेतलेल्या गावांमध्ये वैजापूर तालुक्यातील धोंदलगावचा समावेश झाला.ऑक्टोबर २०१५ मध्येच नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी गावात येऊन कामाला सुरुवात करून दिली.त्या काळात धोंदलगावमध्ये सुमारे ११ बंधारे होते. मात्र, मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने त्यांची पाणी अडवण्याची क्षमता कमी झाली होती.

Nana Patekar
Shahrukh Khan on Nana Patekar : 'तू हिरो नाही, अभिनेता आहेस'; नानांनी शाहरुखला दिलेला गुरुमंत्र, SRK ची भावनिक पोस्ट

दरवर्षी दिवाळीपूर्वीच पिण्याच्या पाण्यासाठी गावाला टँकरवर अवलंबून राहावे लागत होते. फाउंडेशनने या बंधाऱ्यांमधील गाळ काढण्याचे काम हाती घेतले. सुमारे साडेचार किलोमीटर परिसरातील गाळ काढण्यासाठी तब्बल सहा महिने काम सुरू होते.यामुळे पाणी साठवण क्षमता वाढली. त्याचबरोबर गावातील पाण्याची गरज लक्षात घेऊन तीन नवे बंधारेही बांधण्यात आले. या जलसंधारणाच्या कामांमुळे गेल्या दहा वर्षांत गावाला टँकरची गरज भासली नाही.

पाण्याचा प्रश्न सुटल्याचा परिणाम थेट शेतीवर झाला. भूजलपातळी वाढल्याने उत्पादनात वाढ झाली. गावातील सुमारे ८० टक्के क्षेत्रावर दुबार, तर ४० टक्के क्षेत्रावर तिबार पीक घेतले जात असल्याचे ग्रामस्थ सांगतात. पाणी आणि चाऱ्याची उपलब्धता वाढल्याने दुग्धव्यवसायालाही चालना मिळाली. शेती आणि दुग्धव्यवसायातून गावाच्या अर्थव्यवस्थेला बळ मिळाले. गावाचा विकास केवळ जलसंधारणापुरता मर्यादित राहिला नाही. लोकसहभागातून स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. हागणदारीमुक्त गावासाठी प्रयत्न झाले. सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी घरोघरी शोषखड्डे करण्यास ग्रामस्थांना प्रोत्साहित करण्यात आले.

ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्यासाठी दगड-विटा उपलब्ध करून देण्यात आल्या. गावातील खाली-वर असलेल्या जागा आणि रस्त्यांचे सपाटीकरण करण्यात आले. शिक्षणाच्या सुविधांसाठीही नानांनी पुढाकार घेतला. शिक्षणमंत्र्यांशी चर्चा करून धोंदलगावमध्ये दोन मजली इमारतीतील चार वर्गखोल्यांना मंजुरी मिळवून देण्यात आली. स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी पाणी फिल्टर प्लांट सुरू करण्यात आला. गावातील नेहाबाई शिरसाट आणि गंगाधर जाधव या दोन कुटुंबांना नाम फाउंडेशनच्या माध्यमातून घरेही बांधून देण्यात आली.

दत्तक घेतल्यानंतर नाना सहा-सात वेळा धोंदलगावमध्ये आले. एका भेटीत त्यांनी तब्बल दोन दिवस गावात मुक्काम केला. त्यांच्या भेटी केवळ औपचारिक नव्हत्या. ते ग्रामस्थांमध्ये मिसळले, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. गावातील अनेकांची नावे नानांना तोंडपाठ होती. जवळपास प्रत्येक घरात त्यांनी चहा-पाणी घेतले होते. त्यामुळे नाना आणि धोंदलगावकरांचे नाते दत्तक गावाच्या पलीकडे गेले होते. काही महिन्यांपूर्वी नानांनी गावातील युवकांसोबत विशेष बैठक घेतली होती.

युवकांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योजक बनावे, स्वतःच्या पायावर उभे राहावे, अशी त्यांची इच्छा होती. गावाच्या पुढच्या पिढीने स्वावलंबी व्हावे, हे त्यांचे स्वप्न होते. नानांच्या निधनानंतर धोंदलगावमध्येच शोकसभा घेण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. ज्या गावाला त्यांनी दुष्काळाच्या छायेतून बाहेर काढण्यासाठी हात दिला, त्याच गावाच्या डोळ्यांत आज अश्रू आहेत. बंधाऱ्यांमध्ये साठलेले पाणी, हिरवीगार झालेली शेती आणि गावाच्या विकासाच्या प्रत्येक पाऊलखुणेत नानांच्या कामाची आठवण राहणार आहे. ‘आपला नाना’ म्हणून गावाने जपलेला हा माणूस आता नसला, तरी धोंदलगावच्या मनात त्यांचे स्थान कायम राहणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news