

Mukesh Salve attacks criminal with a coyote as soon as he is released from jail
मुकुंदवाडी भागात अवैध धंदे आणि गुन्हेगारांचा धुमाकूळ सुरूच आहे. जुगार खेळताना झालेल्या वादातून मोक्क्याच्या गुन्ह्यातून नुकताच बाहेर आलेला कुख्यात गुंड मुकेश साळवेने दुसऱ्या एका सराईत गुन्हेगारावर कोयत्याने हल्ला केला. डोक्यात घाव घालून ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना मंगळवारी (दि.२) सकाळी साडेनऊच्या सुमारास सिडको मैदानात, विसर्जन विहिरीजवळ घडली. बाळू भागाजी मकळे (२८, रा. मुकुंदनगर) असे जखमीचे नाव आहे.
फिर्यादी बाळू मकळे याने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी मुकेश साळवे, बाबासाहेब शिंदे सोबत तो सिडको मैदानात चामफूल नावाचा खेळ खेळत होते. तेव्हा आकडे पडण्यावरून मुकेशसोबत बाळूचा वाद झाला. मुकेशला नीट खेळ, असे म्हणताच त्याने शिवीगाळ करून मारहाण सुरू केली. मी मुकुंदवाडी गावाचा दादा असून, मी आताच मोक्क्याच्या गुन्ह्यातून बाहेर आलोय. माझे कोणीच वाकडे करू शकत नाही. तू मला भिडतो, अशी धमकी देऊन कोयता काढून थेट बाळूवर हल्ला चढविला. बाळ्या तुला जिवंत सोडणार नाही, मारूनच टाकतो, तू मुकेश दादाला भिडतो का, असे म्हणत डोक्यात घाव घातला.
बाळू रक्तबंबाळ होऊन खाली कोसळला. तेव्हा मुकेशने दुसरा घावही डोक्यातच घातला. तिसऱ्यांदा मुकेशने कोयता उगारताच बाळू कसाबसा उठून तेथून पळत सुटला. मी मुकेश दादा आहे. तुला सोडणार नाही, असे तो ओरडत होता. बाळूने थेट मुकुंदवाडी पोलिस आजा ठाणे गाठले. त्याला उपचारासाठी मेमो देऊन पोलिसांनी घाटीत पाठवले. त्यानंतर मुकेश साळवेविरुद्ध जीवघेणा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, जखमीही रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्यावर चोरी, चेन स्नॅचिंगसह अन्य गंभीर गुन्हे दाखल आहेत.
मैदानावर विसर्जन विहिरीकडे अनेक नागरिक सकाळी फिरायला येतात. मुकेशने बाळूवर हल्ला केल्याने तिथे आलेले नागरिक घाबरून पळून गेले. भरदिवसा मुकुंदवाडीत गुंडगिरी, दहशतीचे वातारण असून, पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे गुन्हेगारांची हिम्मत वाढत असल्याचे बोलले जात आहे.
गुन्हा दाखल होताच मुकुंदवाडी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक सचिन वायाळ यांनी मुकेश ऊर्फ मुक्या महेंद्र साळवे (२७, रा. श्रीसंकट मोचन मंदिराजवळ, मुकुंदवाडी) याला अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याची दोन दिवसांच्या पोलिस कोठडीत रवानगी केली. पोलिसांनी त्याच्याकडून हत्यार जप्त केले आहे.
मुकेश साळवे इंस्टाग्रामवर हातात शस्त्र, कोयते, चाकू, तलवारी घेऊन व्हिडिओ पोस्ट करतो. त्याच्या प्रोफाइलवर अद्यापही हे व्हिडिओ तसेच आहेत. यावर पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. जेलमधून सुटून आल्यावर तो पुन्हा इंस्टाग्रामवर सक्रिय झाला आहे.
कुख्यात मुकेश साळवे याची टोळी आहे. त्या टोळीत विक्की ऊर्फ हेल्मेट सोनकांबळे, बालाजी पिवळ, उमेश गवळी, किशोर शिंदे, रोहित म्हस्के, अजय ऊर्फ अज्या ऊर्फ भज्या आदमाने, सुंदर ऊर्फ सुंदऱ्या कांबळे, संकेत लांबदांडे असे सराईत गुन्हेगार आहेत. मार्च महिन्यात जुगाराचा क्लब सुरू करण्यावरून या टोळीने अवैध दारू विक्रेता सुनील डुकळेवर शस्त्राने हल्ला केला होता. या टोळीयुद्धात हेल्मेट, मुकेशसह अन्य काही आरोपी जेलमध्ये होते.
मुकेश साळवे हा कुख्यात गुन्हेगार असून, त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे १६ पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. अनेकवेळा मोक्का, एमपीडीएच्या कारवाईत तो जेलमध्ये राहिलेला आहे. तरीही बाहेर आल्यावर त्याच्या गुन्ह्याचा आलेख वाढतच जातो.