

More than 4 thousand school IDs approved in Sambhajinagar division
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्त-सेवा : बोगस शिक्षक भरती प्रकरणी नियुक्त विशेष चौकशी पथक (एसआयटी) राज्यातील सर्व शालार्थ आयडी प्रकरणांची चौकशी करणार आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातील गेल्या सहा वर्षांत तब्बल ४ हजारांपेक्षा अधिक शालार्थ आयडी प्रकरणे मंजूर झालेली आहेत. सध्या त्या सर्व प्रकरणांच्या संचिका संकलित करण्याचे काम सुरू आहे. एसआयटीकडून या प्रकरणांची लवकरच पडताळणी होणार आहे.
काही महिन्यांपूर्वी नागपूर विभागात बोगस शिक्षक भरतीचा घोटाळा उघडकीस आला. अपात्र शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नावे शालार्थ प्रणालीमध्ये समाविष्ट करण्यात आले. या प्रकरणी शिक्षण विभागातील काही अधिकाऱ्यांना अटकही झाली. यानंतर राज्य सरकारने राज्यभरातील शालार्थ आयडी प्रकरणांची चौकशी करण्यासाठी ७ऑगस्ट रोजी पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी पथकाची स्थापना केली.
पथकात पोलिस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) मनोज शर्मा, शिक्षण आयुक्तालयातील सहसंचालक हारुण आतार यांचा सदस्य म्हणून समावेश आहे. मराठवाड्यात बीड आणि लातूर जिल्ह्यात अनेक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बोगस नियुक्ती दिली गेल्याच्या तक्रारी आहेत. तीन महिन्यात विभागात पथक अद्याप आ लेले नाही. परंतु मंजूर शालार्थ आयडी प्रकरणांच्या संचिका एकत्रित करणे, तक्रारीच्या सुनावणीबाबत सूचना करण्यात आल्या होत्या. विभागात छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, हिंगोली जिल्ह्यांचा समावेश आहे. पाच जिल्ह्यांतील संचिका एकत्रिक करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे अधिकारी सूत्रांनी सांगितले.
अनुदानित आणि अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता, शालार्थ मान्यता, सेवासातत्य, विनाअनुदानित वरून अनुदानित पदावर केलेली बदली यांची तपासणी केली जाणार आहे. २०१२ पासून ते आजतागायत प्रकरणांची चौकशी करण्याचे निर्देश पथकाला आहेत. पथकाने शिक्षण उपसंचालकांना केलेल्या निर्देशानुसार तक्रारींची कार्यालयस्तरावर सुनावणी घेण्यात आली. त्याचा अहवालही सादर करण्यात आले आहेत.
लातूर, पुण्याहून संचिका मागविल्या
छत्रपती संभाजीनगर उपसंचालक कार्यालयाअंतर्गत पाच जिल्हे येतात. या पाच जिल्ह्यांमध्ये मागील सात वर्षांत ४ हजार ७५ शालार्थ आयडी मंजूर करण्यात आले. त्यातील काही संचिकांना पुणे येथील संचालक कार्यालयाकडून आणि काही संचिका लातूर येथील सहसंचालकांकडून मंजूर करण्यात आलेल्या आहेत. तर काही संचिकांना या छत्रपती संभाजीनगर उपसंचालकांकडून मंजुरी देण्यात आली. आता या सर्व संचिका महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या छत्रपती संभाजीनगर विभागीय कार्यालयात जमा केल्या जात आहेत.