

Mocha on notorious gangster Tippa's gang for the second time
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
पुंडलिकनगरातील कुख्यात गुंड शेख जावेद ऊर्फ टिप्या शेख मकसूद याच्या टोळीवर पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी दीड वर्षात दुसऱ्यांदा मोक्का अंतर्गत कारवाई करून चांगलाच दणका दिला आहे. टिप्यासह टोळीतील अर्जुन राजू पवार, आकाश ऊर्फ टग्या मदन मगरे, शेख बादशहा शेख बाबा, भूषण गणेश गवई आणि अभिषेक छगन मोरे अशी आरोपींची नावे असल्याची माहिती गुरुवारी (दि.९) गुन्हे शाखेचे निरीक्षक संभाजी पवार यांनी दिली.
अधिक माहितीनुसार, सेव्हनहिल भागातील हॉटेल बंजारा येथे २०२४ मध्ये तरुणावर प्राणघातक हल्ला केल्यानंतर टिप्यावर मोक्काची कारवाई करून त्याला जेलमध्ये टाकले होते. मात्र जेलमधून सुटताच २ ऑगस्ट रोजी तलवार लावून व्यावसायिकाचे अडीच लाख रुपये लुटून टोळीसह पसार झाला होता. महिनाभरानंतर तो न्यायालयात शरण आला होता. टिप्याविरुद्ध खून, दरोडा, जबरी चोरी, हाफ मर्डर, शस्त्र बाळगणे, अपहरण, खंडणी, विनयभंग, दंगा, पिस्तूल बाळगणे आदी गंभीर गुन्हे दाखल आहेत.
त्याच्यावर मोक्का लावण्याची पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी बुधवारी (दि.८) परवानगी दिली. ही कारवाई डीसीपी प्रशांत स्वामी, एसीपी रत्नाकर नवले, संपत शिंदे, मनीष कल्याणकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक संभाजी पवार, पुंडलिकनगर ठाण्याचे निरीक्षक अशोक भंडारे, एपीआय शिवप्रसाद कहऱ्हाळे, पीएसआय अर्जुन राऊत, कोळेकर, म्हस्के, डोंगरे, दीपाली सोनवणे, महादेव दाणे, विनोद गायकवाड, निकम, बिडकर, साळुंखे, पवार, शिंदे यांनी केली.
कुख्यात गुंड टिप्या सातत्याने गंभीर गुन्हे करत असल्याने पोलिसांनी २०१९, २०२१ आणि २०२३ अशी तीन वेळा एमपीडीएची कारवाई करून हर्मूल जेलमध्ये टाकले. २०२४ मध्ये त्याच्यावर मोक्का लावला. मात्र तरीही तो बाहेर येताच पुन्हा गंभीर गुन्हा करतोच. त्यामुळे अधिक काळ त्याचा मुक्काम जेलमध्येच राहिला आहे. पोलिसांनी पुंडलिकनगरच्या रस्त्यावरून येथेच्छ धुलाई, झिपऱ्या पकडून उचलबांगडी करून धिंड काढली होती.