Chhatrapati Sambhajinagar Crime: महापालिकेत गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीचा धुडगूस; कर्मचाऱ्यांना धमक्या देत कार्यालयात गोंधळ

आयुक्तांचे पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे आदेश : आरटीआयच्या आडून दबावाच्या राजकारणाची चर्चा
Chhatrapati Sambhajinagar Crime
Chhatrapati Sambhajinagar Crimepudhari photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : एका गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीने थेट कार्यालयात घुसून महापालिकेच्या नगर रचना विभागातील कर्मचाऱ्यांना धमकावत गोंधळ घातल्याने गुरुवारी (दि. २५) काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर सुरक्षारक्षकांना बोलावण्यात आल्यानंतर संबंधिताने तेथून काढता पाय घेतला.

या घटनेची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी संबंधिताविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. परंतु माहिती अधिकार (आरटीआय) कायदा प्रशासनात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढविण्यासाठी अस्तित्वात असला तरी महापालिकेत काही व्यक्तींकडून आरटीआयच्या आडून अधिकारी, कर्मचारी आणि बांधकाम व्यावसायिकांवर दबाव टाकण्याचे प्रकार वाढल्याची चर्चा आहे.

Chhatrapati Sambhajinagar Crime
Sindhudurg News : बनावट सह्याप्रकरणी पाच ठेकेदारांविरुद्ध गुन्हा

महापालिकेच्या विविध विभागांकडे माहिती अधिकाराचे अर्ज दाखल होत असले तरी नगर रचना विभाग सर्वाधिक निशाण्यावर असल्याचे दिसून येत आहे. बांधकाम परवानग्या, मंजूर नकाशे, विविध मंजुरींची कागदपत्रे आणि तांत्रिक माहिती मोठ्या प्रमाणावर मागवून त्यातील त्रुटी शोधल्या जातात. त्यानंतर संबंधित अधिकारी किंवा बांधकाम व्यावसायिकांशी संपर्क साधून त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे. काही प्रकरणांत ब्लॅकमेलिंग आणि खंडणीची मागणी झाल्याचेही बोलल्या जात आहे. विशेष म्हणजे, नगर रचना विभागात एका व्यक्तीने तब्बल ७० हून अधिक माहिती अधिकार अर्ज दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.

संबंधिताचा त्या बांधकामांशी किंवा प्रकरणांशी कोणताही संबंध नसतानाही मोठ्या प्रमाणावर माहिती मागविली जात आहे. त्यामुळे विभागाच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होत असून, अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. तसेच कार्यालयीन वेळ संपल्यानंतर विशेषतः सायंकाळी सहा वाजेनंतर काही व्यक्ती विभागात येऊन कर्मचाऱ्यांवर दबाव टाकत असल्याच्या तक्रारीही आहेत. गुरुवारी घडलेली घटना ही त्याच प्रवृत्तीचा भाग असल्याचे बोलले जात आहे.

यापूर्वीही झाली होती तक्रार

माहिती अधिकाराच्या नावाखाली सुरू असलेल्या संशयास्पद कारवायांबाबत यापूर्वीही महापालिका प्रशासनाने दखल घेतली होती. तत्कालीन महापौर त्र्यंबक तुपे यांनी अशा अर्जाची माहिती संकलित करून तत्कालीन पोलिस आयुक्तांकडे चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर काही काळ अशा प्रकारांना आळा बसला होता. मात्र आता पुन्हा ही प्रवृत्ती डोके वर काढत असल्याची चर्चा आहे.

Chhatrapati Sambhajinagar Crime
Vedant Bandgar Murder Case : हमालांचा सोमवारपासून बेमुदत काम बंदचा इशारा

पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह

नगर रचना विभागातील गुरुवारच्या घटनेनंतर आयुक्त अमोल येडगे यांनी संबंधिताविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले असले तरी अशा प्रकारांची माहिती असूनही काही पदाधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे या प्रकरणात काही लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news