

छत्रपती संभाजीनगर : राज्यतील सिंचन विभाग हा कुठल्याही नद्या, नाल्यांना संरक्षण भिंत बांधण्यापूर्वी त्यांच्या पूर नियंत्रण रेषा निश्चित करते. त्यात रेडलाईन, ब्ल्यू लाईनचे नकाशे तयार करून त्यांना प्रशासकीय मंजुरी घेते. त्यानंतरच संरक्षण भिंतीच्या कामासाठी नकाशानुसार निविदा प्रक्रिया राबविते. परंतु, असे असताना मराठवाडा सिंचन विभागाने जालन्यातील घनसावंगीत आणि अंबड तालुक्यात सात ठिकाणी पूर संरक्षण भिंत बांधण्यासाठी नकाशे तयार करून त्यास मंजुरी न घेताच निविदा प्रक्रिया राबविल्या. एवढेच नव्हे तर कंत्राटदार निश्चित करून कामही सुरू करण्याचे आदेश दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
दुष्काळग््रास्त मराठवाड्यात सिंचनाचे प्रकल्प राबवून शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देण्यावर राज्य आणि केंद्र शासन भर दिला आहे. त्यासाठी दरवर्षी हजारो कोटींचा निधी मंजूर केला जातोय. यासोबतच लघु, मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो होऊन नद्या, नाल्यांना पूर येऊ नये, नागरी वसाहतींसह शेतकर्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी पूर नियंत्रण रेषा निश्चित करून त्याठिकाणी संरक्षण भिंत बांधण्याचे कामे करण्यावर लक्ष केंद्रीत केले आहेत. परंतु, या कामात देखील सिंचन विभागातील अधिकारी मर्जीतील कंत्राटदारांसाठी नियमांना सपशेल केराची टोपली दाखवून कार्यादेश देत असल्याच्या तक्रारी येत आहेत.
त्यातील एक जालना जिल्ह्याच्या घनसावंगी आणि अंबड तालुक्यातील संरक्षण भिंती बांधण्याची कामे असून यासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर आहे. हे काम मान्सूनपूर्वी होणे आवश्यक असतानाही मार्च महिन्यात निविदा काढण्यात आल्या. परंतु, या निविदा काढण्यापूर्वी पूर नियंत्रण रेषा निश्चितीचे नकाशे तयार करून त्याची मंजुरी घेणे आवश्यक होते. मात्र, सिंचन विभागाच्या कार्यकारी अभियंता आणि उपअभियंतांनी या कामासाठी नकाशे तर तयार केले. मात्र, त्यांना मंजुरी न घेताच त्या नकाशांच्या आधारे निविदा प्रक्रिया राबविली. एवढेच नव्हे तर कंत्राटदारदेखील निश्चित करून कामाचे वाटपही केले आहे.
प्राध्यान्य क्रमांनाही बगल
जिल्हाधिकारी कार्यालयाने गतवर्षी घनसावंगी तालुक्यातील पुराचा फटका बसणार्या नदीकाठच्या 18 गावांची यादी तयार केली होती. वास्तविक पाहता या गावांमध्ये संरक्षण भिंत बांधण्याच्या कामांना प्राधान्य देणे गरजेचे होते. मात्र जलसंपदाने 18 पैकी केवळ कोठी आणि अंतरवाली टेंभी या दोन गावांसाठीच निविदा काढल्या, तर अन्य पाच गावे दुसरीच निवडली.
नकाशाविना निविदा कशी काढू- जालनाच्या घनसावंगी आणि अंबड तालुक्यांतील नद्यांना संरक्षण भिंती बांधण्यासाठी पूर नियंत्रण रेषा निश्चितीचे नकाशे तयार केलेले आहेत. त्याशिवाय निविदा कशा काढू, आम्ही काम करूच शकत नाही.
उमेश वानखेडे, कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग
नकाशे मंजूर नाहीत- घनसावंगी, अंबड येथील पूर संरक्षण भिंत बांधण्याच्या कामासाठी पूर नियंत्रण रेषा निश्चितीचे नकाशे तयार केले. परंतु, त्यांना अद्याप मंजुरी मिळालेली नाही. हे नकाशे मंजुरीसाठी मुख्य अभियंत्यांकडे पाठविले आहेत.
विजय ढाकणे, उपअभियंता, जलसंपदा