

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील आपत्तीच्या काळात तातडीने उपाययोजना करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करून देण्याची तरतूद शासनाने केली आहे. जिल्हा वार्षिक योजने(सर्वसाधारण) अंतर्गत मंजूर निधीपैकी ५ टक्के रक्कम अतिवृष्टी, पूर व गारपीट उपाययोजनांसाठी तसेच आणखी ५ टक्के रक्कम टंचाई उपाययोजनांसाठी वापरण्याची परवानगी दिली आहे. आपत्तीची तीव्रता वाढल्यास हा खर्च जिल्हा नियोजन समितीच्या मान्यतेने 10 टक्क्यांपर्यंत वाढवता येणार आहे.
जिल्हाधिकारी व जिल्हा नियोजन समिती अध्यक्षांना हा निधी खर्च करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. मात्र केलेला खर्च पुढील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजूर करणे बंधनकारक राहील. खर्चाचे हिशोब व लेखे पारदर्शक ठेवण्यावर शासनाने विशेष भर दिला आहे. पूर व अतिवृष्टीग्रस्त भागांत लोकांचे स्थलांतर, मदत कॅम्प उभारणे, अन्नधान्य व कपडे पुरवणे, आरोग्य सुविधा उपलब्ध करणे, पिण्याचे पाणी पुरवठा, जनावरांसाठी चारा व औषधे, मृत व्यक्ती व जनावरांची विल्हेवाट, रस्ते, पूल, शाळा व अंगणवाडींची तात्पुरती दुरुस्ती, तसेच वीजपुरवठ्याची व्यवस्था करण्यास प्राधान्य दिले जाणार आहे.
याशिवाय पाणीपुरवठा योजना, हातपंप व नळयोजना दुरुस्ती, गाळ काढणे, तसेच शहर व गावांमध्ये कचरा व्यवस्थापन, स्वच्छता व सुरक्षितता उपाययोजना करण्यात येतील. टंचाईसाठी टंचाईग्रस्त भागांत तात्पुरत्या पाणीपुरवठा योजना, नव्या विहिरी व बोरवेल खोदकाम, विहिरींची दुरुस्ती व खोलसफाई, टँकरने पाणीपुरवठा, पिण्याच्या पाण्यासाठी साठवण टाक्या उभारणे, तसेच जनावरांसाठी चारा छावण्या व डेपो सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय पाणीपुरवठा योजनांमध्ये नवे पंप बसविणे व दुरुस्ती करण्याचाही समावेश आहे.
राज्यात पावसाचे प्रमाण अनियमित असल्याने काही भागात अतिवृष्टी तर काही भागात दुष्काळाची परिस्थिती वारंवार निर्माण होते. अशा वेळी निधी उपलब्ध होण्यास विलंब होत असल्याने तातडीच्या मदतीत अडथळे निर्माण होतात. ही तफावत भरून काढण्यासाठीच जिल्हा वार्षिक योजनेतील निधीचा वापर करण्यास परवानगी दिली आहे. शासनाचा उद्देश म्हणजे आपत्तीग्रस्त भागात जलद गतीने मदत पोहोचविणे व जनतेच्या अडचणी कमी करणे हा आहे. या निर्णयामुळे जिल्हा प्रशासनाला नैसर्गिक आपत्तींना सामोरे जाताना तातडीने निधी उपलब्ध होईल आणि त्यामुळे पूर, अतिवृष्टी किंवा टंचाईग्रस्त भागातील लोकांना दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.