मराठा आरक्षण नाही, कॉलेज प्रवेशासाठी २ लाखांची मागणी, तणावातून वडिलांनी जीवन संपवले

जात प्रमाणपत्रासाठीही पैशांची मागणी, पित्याने चिठ्ठी लिहून जीवन संपवले
Father commits suicide in Chhatrapati Sambhaji Nagar
आरक्षण नाही, आणि मुलांच्या कॉलेज शिक्षणाचा खर्च परवडणार नसल्याने छत्रपती संभाजी नगरमध्ये वडिलांनी आत्महत्या केली. इनसेटमध्ये मृत बाळासाहबे पडूळPudhari

छत्रपती संभाजीनगर : मुलाला बारावीच्या परीक्षेत ९२ टक्के गुण मिळाल्यानंतर पुढील प्रवेशासाठी २ लाख रुपये मोजावे लागत असल्यामुळे आर्थिक तणावाखाली आलेल्या वडिलांनी गुरुवारी सकाळी शेतात गळफास घेऊन जीवन संपवले. ही खळबळजनक घटना पहाटे पाचच्या सुमारास उघडकीस आली. बाबासाहेब जनार्दन पडूळ (४२, रा. लाडसावांगी, ता. जि. छत्रपती संभाजीनगर) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. दरम्यान, पोलिसांनी सुसाईड नोट जप्त केली आहे.

लाडसावंगी येथील पडूळ कुटुंब १४ गुंठे जमिनीवर शेती करून उदरनिर्वाह करते. पडूळ यांचा मुलगा साई याला बारावी विज्ञान शाखेच्या परीक्षेत ९२ टक्के गुण मिळाले. त्याच्या पुढील शिक्षणासाठी पडूळ हे देवगिरी महाविद्यालयात गेले होते. तेव्हा प्रवेशासाठी त्यांच्याकडे दोन लाखांची मागणी करण्यात आली. यावेळी मराठा कुणबी प्रमाणपत्र मिळाले तर फी कमी होईल असे सांगण्यात आले.

जातप्रमाणपत्रासाठी तहसीलदारांकडून पैशाची मागणी!

जातप्रमाणपत्र काढण्यासाठी गेल्यावर तहसीलदार रमेश मुंडलोड, उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड यांनी खासरापत्र, भूमी अभिलेख विभागातील नोंदी तपासण्यासाठी पैशांची मागणी करण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. यासंदर्भात मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची भेट घेतली. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी दोन्ही अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच आर्थिक मदतीचे आश्वासन दिले असून, पडूळ यांचा मृतदेह सध्या घाटीत उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आला आहे.

चिठ्ठीमध्ये काय आहे?

मुलगा साई याला बारावी परीक्षेत ९२ टक्के गुण मिळूनही प्रवेशासाठी दोन लाख रुपये पैसे मोजावे लागत आहेत. मराठ्यांना आरक्षण न मिळाल्याने ही परिस्थिती उदभवली आहे, असे चिठ्ठिमध्ये लिहिले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news