छत्रपती संभाजीनगर : पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणासाठी सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी आणि तिन्ही गॅझेट लागू करण्याची मागणी कायम आहे. न्यायमूर्ती संदीप शिंदे यांचा दुसरा व तिसरा अहवाल नेमका काय आहे हे माहीत नाही. तो नकारात्मक असेल तर आम्ही मान्य करणार नाही, अशी स्पष्ट भूमिका मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांनी सोमवारी मांडली.
मनोज जरांगे यांच्यावर शहरातील गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोमवारी (दि. ३०) त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. न्यायमुर्ती शिंदे समितीने मांडलेल्या अहवालात काय आहे हे माहीत नाही. मराठा व कुणबी एकच या मुद्द्यावर शिंदे समितीने काम केले असेल तरच हा अहवाल सकारात्मक म्हणता येईल, असे जरांगे यांनी सांगितले. दसऱ्याच्या दिवशी बीड जिल्ह्यातील नारायणगडावर दसरा मेळावा होणार असून मी मेळाव्याला जाणार आणि बोलणार आहे.
सर्व समाजबांधवांनीही आपल्या दैवताच्या दर्शनासाठी गडावर यावे आणि एकजूट दाखवावी, असे आवाहन त्यांनी केली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या वक्तव्यावर बोलताना जरांगे म्हणाले, टीका न करण्यासाठी अमित शहा हे सूर्य आहेत का? ते केवळ केंद्रीय गृहमंत्री आहेत. मराठ्यांचे आंदोलन सरकारने गोडीगुलाबीनेच हाताळावे. अन्यथा आम्हाला नाईलाजाने 'अरे ला कारे' म्हणावे लागले. पटेल, गुर्जर व पाटीदार एकत्र आले तर तुमचे अवघड होईल.
शिंदे समितीच्या अहवालाबाबत झालेल्या बैठकीवर जरांगे यांनी सोमवारी सायंकाळी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. त्यानंतर लगबगीने सरकारच्या वतीने पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी सोमवारी रात्री उशिरा जरांगे यांची रुग्णालयात भेट घेतली. त्यावर जरांगे म्हणाले, आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. मात्र आचारसंहितेपूर्वी आमच्या मागण्यांवर तोडगा काढावा अन्यथा विधानसभेत तुम्हाला दाखवून देणार, असे जरांगे म्हणाले. यावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतो, असे पालकमंत्री सत्तार म्हणाले.