छत्रपती संभाजीनगर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीराजे, बच्चू कडू, राजू शेट्टी, वामनराव चटप यासह परिवर्तन महाशक्तींच्या नेत्यांनी गुरुवारी (दि.२६) जरांगे यांची शहरातील रुग्णालयात भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. मात्र जरांगे यांची प्रकृती खराब असल्याने राजकीय चर्चा होऊ शकली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीत जरांगे यांचा मोठ्या प्रमाणात मराठवाड्यात प्रभाव दिसून आला. याच अनुषंगाने परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांकडून जरांगे यांना आपल्या आघाडीत घेण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी भेट होती, असेही सूत्रांनी सांगितले. मात्र गेल्या नऊ दिवसांच्या उपोषणामुळे जरांगे यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे चर्चा झाली नाही. जरांगे यांच्यावर शहरातील गॅलेक्सी या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान संयुक्त मेळाव्यासाठी परिवर्तन महाशक्तीचे नेते गुरुवारी शहरात आले होते. मेळाव्यानंतर गुरुवारी रात्री या नेत्यांनी रुग्णालयात जात जरांगे यांची भेट घेतली.
दरम्यान, जरांगे यांच्या सर्व वैद्यकीय तपासण्या पूर्ण झाल्या आहेत. यात त्यांच्या किडनी व लिव्हरवर सूज आली असल्याचे निष्पन्न झाले आहे. तर त्यांची कॅल्शियमची पातळीही मोठ्या प्रमाणात खालावली आहे. नऊ दिवसांनंतर अन्नग्रहण करत असल्याने त्यांना हलके अन्न देण्यात येत होते.
त्यातही त्यांना उलटी, मळमळ व जुलाबचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्या अनुषंगाने पुढील तपासण्या सध्या सुरू आहेत. त्यांची प्रकृती बघता सध्या त्यांना कोणीही भेटण्यास येऊ नये, असे आवाहन जरांगे यांच्यावर उपचार करत असलेले डॉक्टर विनोद चावरे यांनी केले आहे.
यावेळी छत्रपती संभाजीराजे यांनी जरांगे माझे मित्र आहेत. मी छत्रपतींच्या घराण्यातला वंशज या नात्याने जरांगे यांना ताकीद देतो की, त्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी. तसेच प्रकृती ठीक होत नाही, तोपर्यंत कुणाचीही भेट घेऊ नये, अशा सूचना मी डॉक्टरांना केल्या आहेत. असे सांगून दोन दिवस कुठल्याही समाजबांधवांनी जरांगे यांना भेटण्यासाठी येऊ नये, असे आवाहन संभाजीराजे यांनी केले आहे.
जरांगे यांना एवढे दिवस उपोषण करायला लावणे ही सरकारची चूक आहे. त्यांच्यासोबत संवाद साधणे गरजेचे होते. एका वर्षामध्ये सहा ते सात वेळा उपोषण करायला लावणे ही गंभीर बाब आहे. यातून सरकारचा बेफीकीरपणा किती आहे, हे लक्षात येतो. सरकार शब्द बदलत जाते, त्यामुळे फसवणुकीची भावना मनात धरून जरांगे उपोषणाला बसतात. सरकारची ही भूमिका चुकीची आहे, असे शेट्टी म्हणाले.