

गणेश शिंदे
घाटनांद्रा: डिसेंबर आणि जानेवारी महिन्यातील पोषक वातावरणामुळे सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा परिसरात आंब्याची झाडे मोहराने रसरसून गेली आहेत. सर्वत्र आम्रमोहर बहरल्याने आंबा उत्पादकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र, गेल्या काही तासांपासून निर्माण झालेल्या ढगाळ हवामानामुळे या मोहरावर संक्रात येण्याची भीती व्यक्त केली जात असून, शेतकरी वर्गात काहीसा चिंतेचा सूर उमटत आहे.
यावर्षी पावसाने चांगली साथ दिल्याने नदी, नाले आणि तलाव पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत. जमिनीतील ओलावा टिकून असल्याने रब्बी हंगामातील हरभरा, ज्वारी आणि गव्हाची पिके जोमात आहेत. याच अनुकूल परिस्थितीमुळे घाटनांद्रा परिसरातील गावरान आंब्यांच्या झाडांना यंदा विक्रमी मोहर आला आहे. गावरान आंब्याचा तोच खास गोडवा यंदाही चाखायला मिळेल, या आनंदात शेतकरी होते.
मागील महिन्याभरापासून वातावरण अतिशय पोषक होते, मात्र १२ जानेवारीच्या दुपारपासून अचानक वातावरणात बदल झाला. ढगाळ हवामान तयार झाल्याने आलेला मोहर गळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जर हे वातावरण असेच राहिले, तर मोहरावर कीड लागून उत्पादनात मोठी घट होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
आंबा पिकाचे उत्तम उत्पादन मिळवण्यासाठी सध्याच्या परिस्थितीत मोहराचे संरक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ढगाळ हवामान आणि पावसाची शक्यता लक्षात घेता, शेतकऱ्यांनी तातडीने तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार योग्य कीटकनाशकाची फवारणी करावी, जेणेकरून मोहर गळती थांबवता येईल.
महेश चाथे, कृषी सहाय्यक