

Mall culture is flourishing in rural areas
शुभम चव्हाण
छत्रपती संभाजीनगर एकेकाळी केवळ महानगरांची ओळख असलेली मॉल संस्कृती आता गाव-खेड्यांपर्यंत वेगाने पसरत आहे. बदललेली जीवनशैली, वाढलेली. खरेदी क्षमता आणि एकाच ठिकाणी सर्व मिळण्याच्या सोयीमुळे ग्रामीण ग्राहक आता पारंपरिक आठवडे बाजारांऐवजी मॉलला पसंती देऊ लागले आहेत. या नव्या बदलामुळे ग्रामीण बाजारपेठेचा चेहरामोहरा बदलत असून, वर्षानुवर्षे चालत आलेल्या आठवडे बाजारांच्या अस्तित्वावर आणि त्यावर अवलंबून असलेल्या लघुउद्योजकांच्या रोजगारावर गंभीर परिणाम होत आहे.
पूर्वी गावागावांतील आठवडी बाजार हे केवळ खरेदी-विक्रीचे ठिकाण नव्हते; तर ते सामाजिक देवाणघेवाणीचे आणि मनोरंजनाचे केंद्र होते. मात्र, आता तालुका आणि मोठ्या गावांमध्ये उभारले जाणारे मॉल केवळ खरेदीपुरते मर्यादित राहिलेले नाहीत. खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, मुलांसाठी खेळण्याचे झोन्स आणि मनोरंजनाची इतर साधने यामुळे संपूर्ण कुटुंबासाठी मॉल एक आकर्षणाचे केंद्र बनले आहे. शहरी भागांप्रमाणेच ब्रँडेड वस्तू, आकर्षक सवलती आणि चकचकीत वातावरण यामुळे ग्रामीण भागातील तरुण पिढी आणि महिला वर्ग मॉलकडे विशेष आकर्षित होत आहे. खरेदीसाठी मॉलमध्ये जाणे हे आता एक नवीन फॅशन स्टेटमेंट बनले आहे.
मॉलच्या स्पर्धेत आमची किराणा दुकाने, कपड्यांची दुकाने आणि स्थानिक हस्तकला उत्पादने टिकू शकत नाहीत. चकचकीत मॉलसमोर आमचा टिकाव लागत नाही. परिणामी आमच्यासारख्या अनेक लहान व्यावसायिकांना आपले व्यवसाय बंद करावे लागत आहेत, अशी व्यथा एका स्थानिक व्यावसायिकाने मांडली.
पूर्वी कापडाची आणि तयार कपड्याची वेगवे-गळी दुकाने असत. आता मात्र कापड आणि तयार कपडे या मॉलमध्ये मिळतात. तसेच इतर वस्तूंबाबतही तशी स्थिती आहे. त्यामुळे ग्राहकांचा मॉलकडे ओढा वाढला आहे.
या बदलाचा थेट फटका मात्र पारंपरिक व्यवसायांना बसला आहे. एकेकाळी लाखोंची उलाढाल होणारे आठवडे बाजार आता ओस पडू लागले आहेत. अनेक ठिकाणी हे बाजार फक्त जनावरांच्या खरेदी-विक्रीपुरते मर्यादित राहिले असून कपडे, किराणा आणि इतर वस्तूंची विक्री जवळपास थांबली आहे.