

उमेश काळे
छत्रपती संभाजीनगर : धडाडीच्या आणि उमद्या नेत्यांची अकाली एक्झिट हा महाराष्ट्राला लाभलेला शाप आहे का? असाच प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर समोर येतो.
अलीकडच्या काळात महाराष्ट्राला पहिला धक्का बसला तो भाजप नेते प्रमोद महाजन यांच्या निधनाने. भावी पंतप्रधान म्हणून त्यांच्याकडे सारा देश पाहत असताना 22 एप्रिल 2006 रोजी त्यांना त्यांचे बंधू प्रवीण महाजन यांनी गोळ्या झाडल्या. महाजन यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले खरे, परंतु मृत्यूशी झुंज त्यांची अपयशी ठरली. हा नेता 3 मे 2006 रोजी सोडून गेला. महाजनांपाठोपाठ विलासराव देशमुख यांचा झालेला मृत्यू सर्वांना दुःखदायकच ठरला. सरपंच पदापासून ते मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री असा प्रवास करणारे विलासराव यांना यकृताचा आजार झाला आणि ध्यानीमनी नसताना १४ ऑगस्ट 2012 रोजी त्यांचे निधन झाले.
गोपीनाथ राव मुंडे यांचे झालेले अपघाती निधन साऱ्या महाराष्ट्राला धक्का देणारे ठरले. नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात त्यांचा समावेश झाला असताना बीड येथे त्यांचा सत्कार स्वीकारण्यासाठी ते दिल्लीहून निघाले असताना एका कारने त्यांच्या वाहनाला धडक दिली आणि काळाने हा नेता हिरावून घेतला. 16 फेब्रुवारी 2015 हा दिवसही महाराष्ट्रासाठी असाच दुःखाचा ठरला. या दिवशी तत्कालीन उपमुख्यमंत्री आर आर आबा पाटील यांचे कर्करोगाने निधन झाले. आबा या नावाने कार्यकर्त्यांमध्ये ते लोकप्रिय होते कॅन्सरचे निदान झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी मुंबईत लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, ते मृत्यूवर मात करू शकले नाही.
काँग्रेस नेते आणि राहुल गांधी यांचे निकटचे सहकारी राजीव सातव यांचा वयाच्या अवघ्या 46 व्या वर्षी कोरोनाने झालेल्या मृत्यू सर्वांना हळहळ देणाराच ठरला सातव यांना कोरोनाची निदान झाल्यानंतर त्यांना पुणे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते पण 16 मे 2021 रोजी सातव यांचे निधन झाले. मराठा आरक्षणासाठी लढा देणारे शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांचा 14 ऑगस्ट 2022 रोजी अपघाती मृत्यू झाला. मेटे यांचा मृत्यू मनाला चटका लावणारा ठरला.
जिचकार, आनंद दिघे या नेत्यांप्रमाणेच युवा नेते डॉ. श्रीकांत जिचकार, शिवसेना नेते आनंद दिघे यांचे मृत्यूही महाराष्ट्राला धक्का देणारे ठरले. जिसका रहे उच्चविद्याभूषित होते आणि काही काळ राज्यात मंत्री म्हणून त्यांनी काम केले होते तसेच राज्यसभा सदस्य म्हणूनही ते कार्यरत होते पण आपल्या शेतातून नागपूरला घरी परतत असताना ट्रकने उडवल्यामुळे क्रूरकाळाने त्यांना हिरावून घेतले. आनंद दिघे हे शिवसेनेचे वजनदार नेते. ठाणे जिल्ह्यात त्यांचा दबदबा होता विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ते गुरु. किरकोळ अपघाताचे निमित्त होऊन त्यांचा मृत्यू झाला आणि बाळासाहेबांचा एकनिष्ठ शिव सैनिक काळाच्या पडद्याआड गेला