

छत्रपती संभाजीनगर, नेहमीच निर्सगाच्या लहरीपणाला बळी पडत असलेल्या मराठवाड्यात यंदाही जून ते ऑक्टोबर दरम्यान अतिवृष्टी, पुर परिस्थिती यामुळे तब्बल १९ लाख हेक्टराहून अधिक क्षेत्रातील खरीप पिकांसह फळबागांना फटका बसला होता. यामुळे २५ लाखांहून अधिक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतनिधी देण्यासाठी शासनाने २ हजार ७३८ कोटी ६२ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यात ३१ ऑगस्टच्या रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली होती. १ सप्टेंबरला देखील पावसाचा जोर कायम होतो. या २४ तासात मराठवाड्यात ८७.१ मिमी पाऊस झाला त्यात विभागातील तब्बल २८४ मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली. या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पुरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. पुढील तीन ते चार दिवसही सर्वदूर पाऊस झाला.
महसूल विभागाच्या अहवालानुसार या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील २८ लाख ४८ हजार २५३ शेतकऱ्यांचे २३ लाख १० हजार ७७०.२८ हेक्टरवरील खरीप पिकांचे तसेच फळबागांचे नुकसान झाले. यात २२ लाख ५३ हजार ६६१.५९ हेक्टरवरील जिरायत क्षेत्र बाधित झाले. तसेच १७ हजार ९०९.५ हेक्टरवरील बागायत तर ३९ हजार १९९.१९ हेक्टरवरील फळपिकांना जबर फटका बसला. या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्यात बसला. यासह परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगरासह अन्य जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात बाधित क्षेत्र होते. त्यानंतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी संबंधित जिल्ह्याकडून विभागीय आयुक्तालयामार्फत निधी मागणीचा प्रस्ताव ऑक्टोबरमध्ये शासनाकडे दाखल करण्यात आला होता.
तत्पुर्वी जून महिन्यात लातूर व परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले होते. यासह जुलै ते ऑगस्ट दरम्यान झालेल्या पावसामुळे बीड, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड आदी जिल्ह्यातील पिकांना फटका बसला होता. जून, जुलैत झालेल्या नुकसानीबाबत निधी मागणी प्रस्ताव बहुतेक जिल्ह्यांनी सप्टेंबर महिन्यातच दाखल केला होता.
शेतीपिकांच्या नुकसानीकरीता सुधारीत दराने दोन ऐवजी तीन हेक्टरपर्यंत मदत अनुज्ञेत करण्यात आले असून निधी वितरीत करण्याबाबतचा शासन आदेश १० डिसेंबर रोजी जारी करण्यात आला आहे.
जून ते ऑक्टोबर दरम्यान मराठवाड्यातील एकूण १९ लाख ३६ हजार १०९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांसह फळबागांचे नुकसान झाले असून बाधित शेतकऱ्यांची संख्या २५ लाख १७ हजार ३८४ आहे. दरम्यान, पिकांचे झालेल्या नुकसानपोटी भरपाई म्हणून एकूण २ हजार ७३८ कोटी ६२ लाख रुपयांचा निधी वितरीत करण्यास शासनाने मंजूरी दिली आहे. हा निधी डीबीटी पोर्टलद्वारे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.