

Liquor bottles and filth in the vicinity of the historic Rangin Darwaza
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा ऐतिहासिक शहराची प्रमुख तटबंदी म्हणून ओळख असलेला रंगीन दरवाजाचा तळीरामाचा अड्डा बनला असून परिसरात दारूच्या बाटल्या, कचरा, रॅपर आणि हौदात मोठ्या प्रमाणात पाण्याच्या रिकाम्या बाटल्या पडल्या आहेत. जिल्हाधिकारी निवासस्थानासमोरच ही पुरातन वास्तू अस्वच्छता, तळीरामाचा आणि उनाडटप्पूंच्यां हक्काचे स्थान बनले आहे.
इ.स. १६५३ ते १६५९ या काळात हा दरवाजा औरंगजेबचा महाल किलेअर्कचे प्रवेशद्वार म्हणून बांधण्यात आला होता. हा दरवाजा शहराच्या तटबंदीचा एक महत्त्वाचा भाग असून, याच्या दोन्ही बाजूंनी मजबूत बुरुज आहेत. त्यावर तोफा ठेवण्यासाठी जागा आहेत. अशी मान्यता आहे की या दरवाजावर सर्व शाही उत्सव रंगीबेरंगी आतषबाजी करून साजरे केले जात. स्वातंत्र्यानंतर ही प्रथा कायम आहे.
२६ जानेवारी, १५ ऑगस्ट तसेच महाराष्ट्र दिनानिमित्त याच वास्तूवर आकर्षक रंगीत विद्युत रोषणाई केली जाते. शहरात झालेल्या जी-20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर रंगीन दरवाजाचे भाग्य उजळले होते. देशविदेशातील पाहुण्यांनी ही वास्तू अनुभवत या ऐतिहासिक शहराचा इतिहास जाणून घेत येथील वारसा-संस्कृतीबद्दल गौरव नोंदविला होता.
दारूच्या बाटल्या, रॅपरचा खच
या परिसरात रात्रीच काय दिवसा दारूड्यांच्या पायां चालत आहेत. दरवाज्याच्या आतल्या बाजूस अन्नपदार्थ शिजवण्याच्या खुणा दिसून येत आहेत. परिसरात दारूच्या बाटल्या, प्लास्टिक, बॉटल, स्नॅक्सचे रॅपर्स यांचा खच साचला आहे. दरवाजाच्या वरच्या भागातही विना अडथळा यथेच्छ मद्यपान करण्यासाठी तळीराम याचा वापर करत आहेत. त्यामुळे दरवाजाच्या ऐतिहासिकतेवर अवकळा पसरत आहे.
सुशोभीकरणाचे मातेरे
रंगीन दरवाज्याची देखरेख करण्यासाठी येथे सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले होते. दरम्यान अनेक दिवसांपासून येथील सुरक्षा रक्षक गायब दिसून येत आहेत. सुभेदारी विश्रामगृह व परिसराची साफसफाई करणारे महापालिका कर्मचारी क्वचितच या गेटच्या परिसराची स्वच्छता करण्याची तसदी घेतात व तेथेच दुपारी झोपा काढतात. या दरवाजाला पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांना तळीरामांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याची प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी इतिहासप्रेमींकडून होत आहे.