

सिल्लोड : सिल्लोड तालुक्यात शनिवारी (दि. १४) दुपारी विजेच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसाने मोठे संकट ओढवले. वीज पडून दोन सख्ख्या भावांसह एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर चार जनावरेही दगावली. या घटनेने तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास तालुक्यात विजांच्या प्रचंड कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. याच दरम्यान, सरोळा शिवारातील गट क्रमांक २९४ मध्ये वीज कोसळून यश राजू काकडे (वय १४) आणि रोहित राजू काकडे (वय २१) या दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना घडली तेव्हा ते शेतात काम करत असल्याची प्राथमिक माहिती आहे. याच सुमारास मोढा बुद्रुक शिवारातील गट क्रमांक २६६ मध्येही वीज पडून रंजना बापुराव शिंदे (वय ५०) या महिलेलाही आपले प्राण गमवावे लागले.
या नैसर्गिक आपत्तीचा फटका केवळ मानवी जीवनालाच नाही, तर जनावरांनाही बसला. मांडणा येथील गट क्रमांक २९५ मध्ये वीज पडून ज्ञानेश्वर माणिकराव लोखंडे यांची तीन वासरे दगावली. तर अन्वी शिवारातील गट क्रमांक १३९ मध्ये नारायण सांडू बांबर्डे यांची एक म्हैस देखील वीज पडून मृत्युमुखी पडली.
दुसरीकडे, तालुक्यात मृग नक्षत्राने शुक्रवारी (दि. १३) रात्रीपासून जोरदार हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला असून, पेरणीच्या कामांना वेग आला आहे. शुक्रवारी रात्री अजिंठा मंडळात अतिवृष्टी झाली असून, या मंडळात ७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मात्र, शनिवारी घडलेल्या या दुर्दैवी घटनांमुळे आनंदावर विरजण पडले आहे. प्रशासनाकडून तातडीने पंचनामे करण्याचे काम सुरू करण्यात आले असून, मृतांच्या कुटुंबीयांना शासनाकडून योग्य ती मदत देण्याची मागणी जोर धरत आहे.