

हतनूर : कन्नड तालुक्यातील हतनूर परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात बिबट्याचा हैदोस बघावयास मिळत आहे. या दरम्यान मध्यरात्रीच्या वेळी शेतात बांधलेल्या बोकडवर हल्ला करत बिबट्याने फडशा पाडला आहे.
हतनूर येथील शेतकरी छन्नुलाल गुलाबराव कुंठे यांच्या गट नंबर ४८८ मधील शेतात बिबट्याने गोठ्यात बांधलेल्या बोकडवर शनिवारी (दि.१७) मध्यरात्री अचानकपणे हल्ला करून बोकडाचा फडशा पाडला आहे. रविवारी (दि.१८) रोजी सकाळी जनावरांना चारा पाणी करण्यासाठी पवन कुंठे हे उठले असता त्यांना गोठयात बोकड न दिसल्यामुळे त्यांनी आजुबाजूच्या शेतात जाऊन पाहिले. यावेळी लांब फरपटत नेऊन झाडे झुडपात बोकडचे अर्धवट शरीर आढळून आले.
याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली असता वन अधिकारी अशोक आव्हाड, प्रकाश पवार यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करत पंचनामा केला. गेल्या सहा महिन्यांमध्ये जवळपास नऊ ते दहा शेतकऱ्यांच्या पशुधनावर बिबट्याने हल्ला करून त्यांना जीवे ठार केले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून रात्रीच्या वेळी शेतात पिकांना पाणी भरण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण देखील पसरले आहे.
बिबटे व त्यांची पिल्ले ही परिसरातील नागरिकांच्या वेळोवेळी निदर्शनास आली असून, या संदर्भात वन विभागाला माहिती दिली आहे. तरी देखील वन विभागातर्फे अद्यापही कुठल्याही प्रकारची उपाययोजना या बिबट्यांना पकडण्यासाठी करण्यात आली नाही. वनविभागाने लवकरात लवकर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन या बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांतर्फे करण्यात येत आहे.