

देगलूर (छत्रपती संभाजीनगर) : मुखेड तालुक्यातील लेंडी प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील दुर्घटनेत गावकऱ्यांचे मोठे हाल झाले असताना शासनाच्या निष्काळजीपणामुळे १२ जणांचा बळी गेला. शेकडो जनावरे दगावली, शेतपिके व घरे वाहून गेली, शेतकऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. तरीसुद्धा महाराष्ट्र सरकार व स्थानिक आमदार गप्प बसले असताना शिव सेना (उद्धव ठाकरे) पक्षाने थेट तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांकडे धाव घेत तातडीच्या आर्थिक मदतीची मागणी केली आहे.
नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने हैदराबाद येथे तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी शिवसेनेचे महेश पाटील यांनी सांगितले की, लेंडी प्रकल्पातील ६० टक्के पाणी तेलंगणाचा वाटा असल्याने या आपत्तीत बाधित कुटुंबांना, शेतकऱ्यांना, मजुरांना व गोरगरीबांना तेलंगणा सरकारकडून तातडीने आर्थिक मदत जाहीर व्हावी. प्रशासनाने कुठलीही पूर्वसूचना न देता बळजबरीने पोलिस बंदोबस्तात
धरणाच्या घळभरणीचे काम करून गेट बंद केले, त्यामुळे मध्यरात्री गावात पाणी शिरले आणि ही दुर्घटना घडली. ही नैसर्गिक आपत्ती नसून प्रशासनाने घडवून आणलेली मानवनिर्मित आ-पत्ती आहे, असा आरोप आपत्तीग्रस्तांसह शिवसेनेने केला.
दुर्घटनेनंतर तातडीचा उपाय म्हणून प्रशासनाने टीनशेडच्या निवाऱ्याची सोय केली असली, तरी तो निवारा निकृष्ट दर्जाचा असून साध्या प्राथमिक गरजासुद्धा तिथे उपलब्ध नाहीत. वीज, पाण्याची व्यवस्था नाही; शिवाय टीनशेड्स वापराआधीच गळायला लागले आहेत. या संपूर्ण कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप सुद्धा ग्रामस्थ आणि शिवसेनेने केला आहे. यावेळी खा. रवींद्र चव्हाण, श्रीनिवास चव्हाण, उपजिल्हाप्रमुख महेश पाटील, तालुकाप्रमुख बालाजी इंगळे, मुखेडचे तालुकाप्रमुख उमेश पाटील आडलूरकर, देगलूर शिवसेना प्रवक्ता सरपंच बालाजी चोपडे खुतमापूरकर, मुखेड शिवसेना उपतालुकाप्रमुख अनिल पाटील राजूरकर, राहुल ठाकूर आदी उपस्थित होते