Chhatrapati Sambhajinagar news
कन्नड : बुधवारी मध्यरात्री शहरात झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे एका पत्र्याच्या घरावर शेजाऱ्याच्या घराची भिंत पडून पाच जणांचे कुटुंब दबल्याची घटना घडली. यात आयशा अशपाक शेख (११) या बालिकेचा मृत्यू झाला आहे. तर आई सादिया अशपाक शेख (३५), वडील अशपाक शेख (४८), भाऊ रिझवान अशपाक शेख (१४) आणि दिसान अशपाक शेख (१६) जखमी झाले.
यापैकी रिझवानला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर घाटी रुग्णालयात हलविण्यात आले असून, आई, वडील आणि एक मुलगा यांच्यावर कन्नड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू होते. रिझवान वगळता इतर तीन जणांना रुग्णालयातून घरी पाठवले आहे. तहसीलदार विद्याचरण कडवकर यांनी रात्री बारा वाजता भेट देऊन दीड वाजेपर्यंत थांबून विचारपूस केली व कुटुंबाचे सांत्वन केले. सकाळी पंचनामा करून मयत मुलीच्या कुटुंबाला नियमानुसार आर्थिक मदत मिळेल, अशी माहिती तहसीलदार विद्याचरण कडवकर यांनी दिली आहे.
शेख कुटुंबाच्या शेजारी असलेली इमारत जीर्ण झालेली होती. ती पाडण्यात यावी, अशी तक्रार एक-दोन-तीन वर्षांपूर्वीच नगर परिषदेकडे आजूबाजूच्या नागरिकांनी लेखी दिली होती. मार्च महिन्यात तहसीलदार कडवकर यांच्याकडे नगर परिषदेच्या प्रशासक पदाचा कार्यभार असताना शहरात फिरून जीर्ण व धोकादायक इमारतींची पाहणी करून, इमारत मालकांनी स्वतःहून इमारत पाडण्याचे आवाहन केले होते. जर या आवाहनाला संबंधित इमारत मालकांनी प्रतिसाद दिला असता, तर आज एका बालिकेचा बळी गेला नसता. सदर घटनेमुळे आता जीर्ण झालेल्या घरांसह इमारतींचा प्रश्न चर्चेला येणार आहे.