

कन्नड : कन्नड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रतिबंधित पानमसाला आणि सुगंधित तंबाखूची वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनातून १ लाख ५० हजार ६८४ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी वाहनचालकासह राज्याबाहेरील चार उत्पादक व वितरक कंपन्यांचे मालक-संचालक तसेच संबंधित पुरवठादारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिवारी (दि. २८) सकाळी पावणेबाराच्या सुमारास कन्नड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक के. एफ. जारवाल यांनी अन्न सुरक्षा अधिकारी मोहम्मद फरीद अब्दुल रशीद सिद्दीकी यांना व्हॉट्सॲपद्वारे पत्र पाठवून प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा पकडल्याची माहिती दिली. त्यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी सिद्दीकी यांनी पोलीस ठाण्यात उपस्थित राहून पंचांसमक्ष जप्त केलेल्या मुद्देमालाची तपासणी केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरसिंगपूर येथील भोलेश्वर कॉलनी परिसरात पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनाचा पोलिसांनी पाठलाग केला. यावेळी वाहनातून प्रतिबंधित पानमसाला व तंबाखूच्या गोण्या रस्त्यावर फेकून वाहनचालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीस उपनिरीक्षक जारवाल व त्यांच्या पथकाने पंचनामा करून फेकून दिलेला मुद्देमाल ताब्यात घेतला. तपासादरम्यान शेख बिलाल शेख गुलाब गौस (रा. सुवर्ण पालेश्वर कॉलनी, कन्नड) हा वाहनातून विक्रीसाठी प्रतिबंधित अन्नपदार्थांची वाहतूक करत असल्याचे निष्पन्न झाले.
जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये केसरयुक्त विमल पानमसाला, प्रीमियम रजनीवास पानमसाला, प्रीमियम झेड एन ०१ जाफरानी तंबाखू आणि व्ही १ बिग सुगंधित तंबाखूच्या विविध पाऊच व पुड्यांचा समावेश आहे. या साठ्याची एकूण किंमत १ लाख ५० हजार ६८४ रुपये आहे. प्रत्येक ब्रँडचा एक नमुना विश्लेषणासाठी घेण्यात आला असून उर्वरित मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात ठेवण्यात आला आहे. अन्न सुरक्षा अधिकारी यांच्या फिर्यादीवरून शेख बिलाल शेख गुलाब गौस याच्यासह व्हायब्रंट प्रॉडक्ट्स (वलसाड, गुजरात), मगध फ्लेव्हर्स प्रा. लि. (बिहार), मे. सेंटेड इंडलजन्स एलएलपी (धार, मध्य प्रदेश) आणि नेक्सा प्रॉडक्ट्स (वलसाड, गुजरात) या चार कंपन्यांचे मालक-संचालक तसेच संबंधित उत्पादक व पुरवठादारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मानवी आरोग्यास अपायकारक आणि शासनाने प्रतिबंधित केलेल्या अन्नपदार्थांची साठवणूक, वाहतूक व उत्पादन केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणात संघटित गुन्हेगारी किंवा अवैध मार्गाने आर्थिक लाभ मिळविल्याचे निष्पन्न झाल्यास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मकोका) कारवाई करण्याची मागणीही फिर्यादीत करण्यात आली आहे.
दरम्यान, या कारवाईला सोशल मीडियावरील एका पोस्टमुळेही गती मिळाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या पाठलागादरम्यान आरोपींनी पानमसाल्याच्या गोण्या रस्त्यावर फेकून पलायन केल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते योगेश कोल्हे यांना मिळाली. त्यांनी तत्काळ सोशल मीडियावर यासंदर्भात पोस्ट केली. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून मुद्देमाल जप्त केला आणि गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण केली. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक केशरसिंग जारवाल, पोलीस अंमलदार विजय चौधरी आणि विशाल लोंढे यांनी केली. पुढील तपास कन्नड शहर पोलीस करीत आहेत.